संग्रहित छायाचित्र
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर काल रेकी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हे दोघे संशयित मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यास आल्याचे तपासात सिद्ध झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शुक्रवारी सकाळी ०९.१५ वाजाताचे सुमारास दोन संशयीत व्यक्तींनी मोटार सायकलवर संजय राऊत यांच्या घराची रेकी केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती. या तक्रारीवरुन मुंबई पोलीसांनी चौकशी चालू करुन या घटनेची सखोल तपास केला. यामध्ये आढळलेले चार व्यक्ति हे सेल प्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असून ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटटेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या लोकांच्या हाती आलेल्या लॅपटॉपसदृश्य वस्तुमुळे संशय बळावला होता. मात्र अधिक तपास केला असता पाच-सहा मोबाइल फोन लावलेले ते एक बोर्ड होते. ठीकठिकाणी जावून ते मोबाइलचे नेटवर्कची तपासणी करत होते. सीसीटीव्हीमध्ये असणारे लोक हे कर्मचारी होते हे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या तपासासाठी आठ पथके तयार केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे या संशियतांचा शोध घेऊन त्यांना ठाणे कापूरबावडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांकडून संबंधित कंपनीकडून खात्री करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ सातचे उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.