संग्रहित छायाचित्र
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्या व्यक्तव्याच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी ह्या महिला आयोगात जाणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या विषयाच्या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याविषयी चर्चा करताना कलाकारांवर गाडी का घसरते. तसेच महिला कलाकारांचीच नावे का येतात. बीडमध्ये कधी पुरुष कलाकार कार्यक्रमाला गेला नाही का? त्यांचे नाव का येत नाही, असे बोलून धस यांनी स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी असे कुत्सित वक्तव्य केल्याचा आरोप प्राजक्ता माळी हिने केला. तसेच राजकारण्यांनी वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या लोकांच्या नावाचा गैरवापर करणे थांबवावा असे प्राजक्ता माळी यांनी म्हटले.
प्राजक्ता माळी पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. माझ्या वकिलांना सांगून योग्य ते कायदेशीर कारवाई करतील, असं तिने सांगितलं आहे. तसेच माझी आई झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केलेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी.
धस यांच्या वक्तव्याचा विरोध करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली. यावर धस यांना पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर आपण माफी मागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, माझं जे कालचं स्टेटमेंट आहे ते परत पहावं. त्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं मी काहीही बोललेलो नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येपासून डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे. माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे. प्राजक्ताताईंचा गैरसमज त्यांनी दूर करून घ्यावा, असं सुरेश धस यांनी म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.