संग्रहित छायाचित्र
लातूर: संपूर्ण मराठवाडा हिंदुत्त्वाने भारावलेला होता, आजही आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाचा जन्म झाला. महान संत शरदचंद्र पवार यांना धर्माच्या आणि हिंदुत्त्वाच्या गोष्टी छाटायच्या होत्या. यातून लोकांना बाहेर कसे काढायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मग जातीचे राजकारण सुरू झाले. प्रत्येकाला आपली जात प्रिय असते, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करण्यातून संघर्ष सुरू होतो. शरद पवारांनी नेमक्या याच गोष्टी केल्या आणि तुमची माथी भडकवली, अशा शब्दांत बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे ठाकरे यांची जाहीर सभा झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसे उमेदवार संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंह भिकाने अहमदपूर विधानसभा मतदारसंघ उमेदवार, शिवकुमार नागराळे, औसा विधानसभा मतदारसंघ उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरूण शेती सोडून शहरात चालले आहेत. कोणाचं लक्ष नाही त्याच्याकडे, कृषी विद्यापीठ थंडगार बसले आहे. मराठवाड्यामध्ये महिलांना पळून नेण्याचे सर्वात जास्त आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ८०० फूट पाणी लागत नाही. माणसे मराठवाड्यात यायला तयार नाहीत. विद्यार्थांच्या शिक्षणाचा विषय त्याकडे कोणाचे लक्ष नाही. जातीजातींमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात आहे. जग कुठे चालले आहे बघा, विमानतळापासून लातूरपर्यंत येईपर्यंत अर्धा तास गेला, का तर रोड खराब आहेत. सत्ता असून कोणत्याही सेवा देण्यात आल्या नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.