काँग्रेसच्या नेत्याने केला छत्रपतींच्या घराण्यातील सुनेचा अपमान? सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार

छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमा राजे छत्रपती यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी ज्या शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे, ते शब्द महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा अपमान करणारे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 7 Nov 2024
  • 01:07 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुटुंबीयांचा अवमान करणे ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची परंपराच बनली आहे. त्या परंपरेची पुनरावृत्ती काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी केल्याचे दिसून आले. छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमा राजे छत्रपती यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी ज्या शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे, ते शब्द महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा अपमान करणारे आहेत. सतेज पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशीच भावना उभ्या महाराष्ट्रातून व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन गाद्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. थोरली गादी साताऱ्याला असून खासदार उदयन महाराज त्याचे प्रतिनिधित्व करतात तर धाकटी गादी कोल्हापूरला असून काँग्रेसचे खासदार शाहू महाराज त्या गादीचे प्रतिनिधी आहेत. मात्र या दोन्ही गाद्यांचा वारंवार अपमान करण्याचा सिलसिला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू ठेवला आहे. महाराष्ट्राचे मोठे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आता सतेज पाटील यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

शरद पवार यांनी उडवली खिल्ली

कोल्हापूरच्या गादीचे प्रतिनिधी श्रीमंत शाहू महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र युवराज संभाजी राजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदारकी मिळाली. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांचा थेट अपमान केला. "आतापर्यंत राजे पेशव्यांची नियुक्ती करीत होते आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करू लागले" अशी टीका शरद पवार यांनी केली होती. त्यांचा रोख तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा आदर करून त्यांच्या वंशजाना प्रतिनिधित्व द्यावे या उदात्त हेतूने संभाजी राजे छत्रपती यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. परंतु शरद पवार यांनी त्याची खिल्ली उडवली.

संजय राउत यांनी केला अपमान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची कागदपत्रे तपासली पाहिजेत अशी अत्यंत हीन दर्जाची टीका उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. वास्तविक संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यावर टीका करावी इतकी त्यांची पात्रता नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठिंब्याने संजय राऊत यांनी हे धाडस केले. दुर्दैवाने भाजप वगळता अन्य कुठल्याही पक्षाच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्या त्या कृतीचा कधीही निषेध केला नाही.

उद्धव ठाकरे यांनी घातली संभाजीराजे यांना अट

2022 च्या जून महिन्यात महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका लागल्या. कोणत्याही आघाडीकडे अधिकचा उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नव्हती. तेव्हा संभाजी राजे छत्रपती यांनी सर्वांनी आपल्याला बिनशर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधावे अशी अट उद्धव ठाकरे यांच्याकडून घालण्यात आली. संभाजी राजे छत्रपती यांच्या घराण्याचा इतिहास पाहता वास्तविक उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरला जाऊन आदरपूर्वक संभाजी राजे छत्रपती यांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. परंतु संभाजी राजे छत्रपती यांना मातोश्रीवर बोलावण्याचे धाडस उद्धव ठाकरे यांनी केले. छत्रपती शिवरायांची गादी चालवणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी शिवबंधन बांधायचे नाकारले.

महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब

शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी छत्रपतींच्या घराण्याचा कसा अपमान केला, याचे हे अलीकडच्या काळात घडलेले किस्से आहेत. मात्र आता छत्रपतींच्या घराण्यावर हीन शब्दात टीका करण्याचे धाडस काँग्रेसचे कोल्हापुरातील नेते सतेज पाटील देखील दाखवू लागले आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी चिंतनीय आहे.

छत्रपतींच्या घराण्यातील सुनेवर खालच्या शब्दात टीका

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने छत्रपती घराण्याच्या स्नुषा, खासदार शाहू महाराज यांचे पुत्र मालोजी राजे यांच्या पत्नी मधुरिमा राजे यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार यांनी अर्ज मागे घेतला नाही आणि त्यामुळे मधुरिमा राजे छत्रपती यांनी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मागे घेतली. कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. मधुरिमा राजे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सतेज पाटील यांनी अत्यंत खालच्या शब्दात छत्रपतींच्या घराण्यातील सुनेवर टीका केल्याचे दिसून आले."दम नव्हता..." असा शब्दात सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. हा संताप कॅमेऱ्यावर कैद झाला आणि उभ्या महाराष्ट्रात त्याचे दर्शन झाले. हे अपशब्द फक्त एका काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातील नसून शिवछत्रपतींच्या घराण्यातील सुनेच्या विरोधात आहेत आणि हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.

तेव्हा कुठे गेली होती सतेज पाटील यांची हिम्मत ?

शिवछत्रपतींच्या वारसांचा द्वेष करणारी मानसिकताच सतेज पाटील यांच्या शब्दातून व्यक्त झाली, अशी भावनाही जनमानसातून व्यक्त होत आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाने पावन झालेला विशाळगड हा शिवछत्रपतींचा ठेवा आहे. त्याच विशाळगडावर प्रचंड अतिक्रमण झाले. शिवप्रेमी संघटनांनी या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवला. आणि प्रशासनाला या अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करण्यास भाग पाडले. तेव्हा या अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने गडावर जाणाऱ्यात सतेज पाटील यांचा समावेश होता. आज छत्रपती घराण्यातील सुनेच्या विरोधात वाईट शब्दात टीका करणाऱ्या सतेज पाटलांची हिम्मत विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात का उफाळून आली नाही, असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे.

बिनशर्त माफी मागण्याची मागणी

शिवछत्रपती ही महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता आहे. शिवरायांच्या दोन्ही गाद्या महाराष्ट्रासाठी आदरणीय आहेत. त्या दोन्ही गाद्यांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. शिवरायांच्या घराण्यातील सुनेच्या विरोधात हीन भाषेत टीका करणारे सतेज पाटील आणि त्यांच्या काँग्रेसचा माज उतरवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता स्वस्थ बसणार नाही, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून व्यक्त होत आहेत. केलेल्या कृत्याबद्दल सतेज पाटील यांनी महाराष्ट्राची आणि शिवरायांच्या घराण्याची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्रातून होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest