अधिकारी होताच अनिकेत थोरात यांची मिरवणूक
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२२ मधून सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी अनिकेत थोरात यांची निवड झाली. स्पर्धा परीक्षेत अथक परिश्रम घेत अधिकारी झाल्याने गावकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. त्यांची चर्चा पूर्ण पंचक्रोशीत रंगली आहे..
अहिल्यानगर जिल्ह्यातील बारडगाव दगडी येथे गावकऱ्यांतर्फे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांच्या यशाचा सन्मान केला. तसेच पूर्ण गावात त्यांची गाजावाजात उत्साहाने मिरवणूक काढली. गेली वर्षभर रखडलेला राज्यसेवा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात बारडगाव दगडी येथील अनिकेत दत्तात्रय थोरात यांची निवड झाली. अनिकेतचे नागरी सत्कार सोहळ्यात थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. अपार मेहनत आणि कष्ट याला पर्याय नाही. या क्षेत्रात सातत्य आणि चिकाटी महत्वाची आहे. माझ्या या यशात परिवाराचा, गुरुजनांचा, मित्र मंडळी आणि बारडगाव दगडी येथील ग्रामस्थांचा सुद्धा वाटा आहे. या संपूर्ण प्रवासात राम चव्हाण, रोहित काळे, रामदास दौंड, दीपक धांडे, सागर आणि ज्ञानदीप यांची मोलाची मदत झाली. सोबतच या पदावर न थांबता डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, डीवायएसपी या पदांसाठी तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड, कर्जत भाजपाचे सुनील गावडे, तसेच माजी सरपंच जयसिंग कदम, अंबादास खोडवे, वसंत दादा पाटील विद्यालयाचे प्राचार्य सुद्रिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.