संग्रहित छायाचित्र
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पंधरा वर्षे आमदार राहून सत्ता गाजवली. खासदार झाल्यापासून प्रणिती शिंदेंची पकड ढिली झाली की काय असे चित्र निर्माण झाले आहे.सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून चेतन नरोटे हे निवडणूक लढवत आहेत,पण ऐन निवडणूकीत काँग्रेसमधील जुने नेता शौकत पठाण यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे.
असादुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा हात सोडून ,पतंगाची दोरी हातात घेतली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात माकपचे आडम मास्तर, भाजपचे देवेंद्र कोठे, काँग्रेसचे चेतन नरोटे आणि एमआयएमचे फारूक शाब्दि अशी लढत सुरू आहे. २०१४ आणि २०१९ ला निसटता पराभव झालेल्या एमआयएम पक्षाने काँग्रेस आणि भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. शौकत पठाण आणि त्यांच्या सोबत काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी काँग्रेसकडे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न पडला होता. काँग्रेस पक्षाने मुस्लिम आणि मोची सामजाची मागणी बाजूला करत धनगर समाजाचे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
अपक्ष उमेदवारी अर्ज भरत शौकत पठाण यांनी 'काँग्रेसला करारा जवाब मीलेगा' असा इशारा दिला होता. काँग्रेसचे नेते शौकत पठाण हे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात वजनदार नेते म्हणून ओळखले जातात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस नेते चेतन नरोटे यांनी शौकत पठाण यांच्या घरी जाऊन समजूत काढत पाठिंबा मागितला होता. काही काळापुरता काँग्रेसला पाठींबा देत शौकत पठाण यांनी अखेर शेवटच्या क्षणी असद ओवेसी यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश केला.