विमानाने प्रवास करणारे चोरटे गजाआड; पुण्यातील मॉलमध्ये केला हात साफ

राजस्थानामधील जयपूरवरुन विमानाने निघायचे आणि मुंबई गाठायची... मुंबईवरून ‘झूम’ कार बुक करायची... मोठमोठ्या शहरात जायचे... तिथल्या आलीशान मॉलमध्ये प्रवेश करायचा... महागड्या वस्तू आणि कपड्यांवर डल्ला मारायचा आणि पसार व्हायचे.

Pune Crime News

विमानाने प्रवास करणारे चोरटे गजाआड; पुण्यातील मॉलमध्ये केला हात साफ

पुणे : राजस्थानामधील जयपूरवरुन विमानाने निघायचे आणि मुंबई गाठायची... मुंबईवरून ‘झूम’ कार बुक करायची... मोठमोठ्या शहरात जायचे... तिथल्या आलीशान मॉलमध्ये प्रवेश करायचा... महागड्या वस्तू आणि कपड्यांवर डल्ला मारायचा आणि पसार व्हायचे... या पद्धतीने पुण्यासह विविध शहरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून ४ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. (pune crime news)

गौरवकुमार रामकेश मीना (वय १९), बलराम हरभजन मीना (वय २९), योगेशकुमार लखमी मीना (वय २५), सोनूकुमार बिहारीलाल मीना (वय २५, सर्व रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील योगेशकुमार मीना हा टोळीप्रमुख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचे राजस्थानातील राहणारे आहेत. तयांनी देशभरातील विविध मोठ्या शहरांमध्ये असलेल्या मॉलमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. येरवडा येथील संगमवाडीमध्ये असलेल्या रिलायन्स फॅशन फॅक्टरी मॉलमध्ये ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी आले होते. मॉलमधून बाहेर पडत असताना गेटवरील अलार्म वाजला. सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग केला.  जवळच असलेल्या शेल पेट्रोल पंपाजवळ एक मोटार उभी होती. त्यामध्ये अन्य तीन जण बसलेले होते. त्यांचा संशय आल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यांना घेऊन मॉलचे कर्मचारी पोलीस ठाण्यात जायला निघाले. तेव्हा त्यांचा एक साथीदार पसार झाला. उर्वरीत दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यामध्ये गौरव आणि बलराम या दोघांचा समावेश होता. त्यांच्या गाडीची झडती घेतली असतं आयत सीटवर रिलायन्स मॉलमधून चोरलेले शूज, बेल्ट आढळून आले. तसेच डिकीमध्ये डीकॅथलॉन ब्रॅंडचे शूज, पॅन्ट, टी शर्ट आढळून आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, योगेशकुमार लखमी मीना याचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्या मोबाईलचा तांत्रिक तपास सुरू केला. त्याआधारे तो खडकी बाजार परिसरात असल्याची माहिती उपलब्ध झाली. पोलिसांनी खडकी बाजार परिससरातील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचा चौथा साथीदार सोनू कुमार बिहारीलाल मीना याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांच्या पथकाने केली. 

आरोपी जयपूर ते मुंबई असा विमान प्रवास करीत असत. मुंबईला आल्यानंतर झूम कार बुक केली जायची. त्यानंतर विविध बड्या शहरांमध्ये आरोपी जायचे. तेथील मॉलमध्ये खरेदीसाठी जाऊन ब्रॅंडेड कपडे, शूज यांचे सिक्युरिटी व बारकोडचे टॅग तोडून हे कपडे अंगावरच्या कपड्यांच्या आत लपवले जायचे. त्यानंतर, हे सर्वजण पसार व्हायचे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest