Pune Crime: टवाळखोरांमुळे मुलींसाठी चौक धोक्याचे!

शहरातील सर्वच वस्त्यांमधील चौक, कट्टे एवढेच नव्हे तर अंतर्गतरस्ते देखील महिला व मुलींसाठी धोकादायक बनले आहेत. या ठिकाणी महिलांची व मुलींची छेडछाड होते,

टवाळखोरांमुळे मुलींसाठी चौक धोक्याचे!

छेडछाडीमुळे शाळागळती, बालविवाहाचा धोका; शहरातील साडेपाचशे वस्त्यांमध्ये सुरक्षा नावाला

पुणे: शहरातील सर्वच वस्त्यांमधील चौक, कट्टे एवढेच नव्हे तर अंतर्गतरस्ते देखील महिला व मुलींसाठी धोकादायक बनले आहेत. या ठिकाणी महिलांची व मुलींची छेडछाड होते, अश्लील शेरेबाजी होते.  (Pune Crime)

या बाबत घरी सांगितले तर शाळा, काॅलेज व क्लासला जाणे बंद होते. उलट मुलीचीच चूक असल्याचा ठपका पालक ठेवतात. अशा मुलींचे पालक त्यांचा लवकर विवाह लावण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती वस्त्यांमधील मुली अनुभवत आहेत. 

शहरात साधारणतः साडेपाचशे वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात महिला, मुलींची छेडछाडीच्या घटना घडतात. यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या छेडछाडीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होते. 

अनेक घटनांकडे पीडित मुली, महिला व पालक दुर्लक्ष करीत असल्यामुळे याची नोंदच कुठे होत नाही. या संदर्भात शहरातील वस्त्यांमध्ये काम करणा-या स्वयंसेवी संस्था व संस्थेअंतर्गत सहभागी झालेल्या महिला, मुलींशी ‘सीविक मिरर’च्या प्रतिनिधीने संवाद साधला, तेव्हा वस्त्यांधील भयाण वास्तव समोर आले. 

ग्रीनतारा संस्थेच्या डाॅ. मंदा मुने म्हणाल्या, “यशवंतनगर, राजीव गांधीनगर, भीमनगर, एकतानगर येथील वस्त्यांधील पौगंडावस्थेतील मुलींसोबत आम्ही काम  करतो. वस्त्यांमधील टवाळखोर मुले शिट्ट्या मारणे, छेडछाडीमुळे मुलींना त्रास देत असल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अनेक पालकांना  मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठविणे असुरक्षित वाटते. त्यामुळे मुलींचे शाळागळतीचे प्रमाण वाढले आहे. यासह मुलींचा विवाह लवकर लावून देण्यावर पालकांचा भर असतो. “

वस्त्यांमधील पान टप-या, हॅाटेल्स, चहाचे स्टॅाल्स या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या मंडळींची गर्दी असते. अवैध गुटखा विक्री, जुगार व मटका यामुळे वस्त्यांमधील गल्ल्यांमध्ये दिवस-रात्र गर्दी असते. फक्त विकासकामांचा दिखावा करणारे लोकप्रतिनिधी ‘ माथाडी’ या गोंडस नावाखाली गुंड प्रवृत्तीच्या मंडळींची पदाधिकारी म्हणून वर्णी लावतात. हे माथाडीवाले विधिसंघर्षीत मुलांना आपल्या छत्रछायेत ठेवतात.

विधिसंघर्षीत मुलांमध्ये टोळी युद्ध

वस्त्यांमधील परिसरात आपले वर्चस्व या फिल्मीस्टाईल पद्धतीने विधिसंघर्षीत मुले टोळी युद्ध करताना दिसतात. यातून एका गटातील सदस्यास मारहाण किंवा खून झाला तर दुसरा गट पहिल्या गटातील सभासदांचा बदला घेतो. हे दुष्टचक्र सुरूच राहते. त्यामुळे वस्त्यांमधील कोयता गॅंग अधून-मधून सक्रिय होत असल्याचे एका निवृत्त पोलीस अधिका-यांने ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.

शाळेत जाताना चौका-चौकात टवाळखोर मुलांचे गट थांबलेले असतात. कपड्यावरून, सौंदर्यावरून शेरबाजी करतात. मुलींचा मोबाईल नंबर मागतात, फ्रेंडशिपची मागणी करतात. काहीजण तर घरांपर्यंत पाठलाग करतात. छेडछाडीवरून अनेक वेळा भांडणेसुद्धा होतात. स्वतः मार्शल आर्ट शिकत आहे. त्यामुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

- प्रिया खडका, सचिव, यूथ फाॅर चेंज

ग्रीन तारा फाउंडेशनमध्ये गेली सात वर्ष कार्यकर्ती म्हणून काम करीत आहे. येथे नेतृत्व कौशल्य शिकले आहे. त्यामुळे जगण्याचा, शिक्षणाचा, सहभागाचा, संरक्षणाचा व विकासाचा हक्क समजून घेतला आहे. त्यामुळे आत्मविश्वास आला. संवादकौशल्य शिकले. आता निर्भीडपणे बाहेर पडते.  वस्त्यांमध्ये  व्यसनमुक्ती, बालहक्क, बाल कामगार, स्त्री-पुरुष समानता या विषयावर पथनाट्य सादर करतो. “ 

- वैष्णवी शिंदे, महाविद्यालयीन विद्यार्थी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest