आयटी पार्क हिंजवडी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

आयटी पार्क हिंजवडी परिसरात धुळे येथून आणलेल्या गांजाची विक्री करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून तब्बल ३३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Sep 2024
  • 05:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

आयटी पार्क हिंजवडी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

धुळे येथून आणला गांजा, आरोपींकडून ३३ किलो मुद्देमाल ताब्यात

आयटी पार्क हिंजवडी परिसरात धुळे येथून आणलेल्या गांजाची विक्री करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून तब्बल ३३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी (वय ३६, रा. म्हाळुंगे, पुणे. मूळ रा. चित्रकुट, ता. श्रीरामपूर, जि. चित्रकुट धाम करवी, उत्तर प्रदेश), अशोक गुलाबचंद पावरा (वय १९), पवन सानू पावरा (वय १९, दोघे रा. मांजणी पाडा, फतेपुर फॉरेस्ट, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरात गस्‍त घालत असताना पोलीस अंमलदार निखिल शेटे आणि मयूर वाडकर यांना तीनजण संशयास्‍पदरित्‍या जाताना दिसले.

पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे १६ किलो १०४ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल, असा नऊ लाख ५० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे. दरम्यान, आरोपींकडे केलेल्‍या चौकशीत आणखी आठ लाख ५० हजार ४५० रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी केलेल्‍या या कारवाईत एकूण ३३ किलो वजनाचा १८ लाख ६५० रुपये किमतीचा गांजा जप्‍त केला आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, साहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार मयूर वाडकर, निखिल शेटे, प्रदीप शेलार, किशोर परदेशी, शिल्पा कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महाविद्यालय परिसरात विक्री
आरोपी आयटी परिसरातील मोठ्या महाविद्यालयांच्या बाहेर गांजाची विक्री करीत होते. मागील कित्येक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता. अशा प्रकारे कोणी गांजा विक्री करत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest