'जंगल्या'च्या खुनाचा ‘प्लॅन’ रचणाऱ्या एन्जॉय ग्रुपला मोक्का

कुख्यात गुन्हेगार विशाल सातपुते उर्फ जंगल्या याच्या खुनाचा कट रचणाऱ्या घोरपडे पेठेतील एन्जॉय ग्रुप या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Sep 2024
  • 06:29 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

कुख्यात गुन्हेगार विशाल सातपुते (Vishal Satpute) उर्फ जंगल्या (Junglya) याच्या खुनाचा कट रचणाऱ्या घोरपडे पेठेतील एन्जॉय ग्रुप या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. लाईनबॉय आणि गुन्हेगार कुणाल पोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी मोठ्या प्रमाणावर पिस्तुले आणि काडतुसे जमा केली होती. पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

अमित म्हस्कू अवचरे (वय २७, रा. फुरसुंगी, हडपसर), सुमीत उत्तरेश्वर जाधव (वय २६, रा. गंज पेठ), लतिकेश गौतम पोळ (वय २२, रा. कात्रज-कोंढवा रस्ता), शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७, रा. भेकराईनगर, हडपसर), ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४, रा. भारती विद्यापीठ), अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसप्पा उर्फ बसवराज स्वामी (वय २७, दोघे रा. भेकराईनगर, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील अमित अवचरे टोळीप्रमुख आहे. २०१३ साली शंकरशेठ रस्त्यावरील सम्राट हॉटेलमध्ये कुणाल पोळ याच्यावर  जंगल्याच्या टोळीने हल्ला केला होता. त्याच्यावर गोळ्या झाडत तसेच, वार करून खून करण्यात आला होता. एकेकाळी पोळचा साथीदार असलेला जंगल्या त्याच्यापासून दुरावला. वर्चस्वाच्या वादातून पुढे त्याने पोळचा खून केला. मात्र, पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली.

काही दिवसांपूर्वी सासवड येथील दहिहंडीचा कार्यक्रम संपवून घरी निघालेल्या जंगल्यावर कोलवडी परिसरात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. हा हल्ला सुमीत जाधव आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. आरोपी सुमीत हा स्वारगेट परिसरात सक्रिय असलेल्या एन्जाॅय ग्रुपचा सदस्य आहे. आरोपींच्या शोधासाठी चाकण, पिंपरी चिंचवड, मुळशी परिसरात एक पथक पाठविण्यात आले होते. दुसरे पथक सासवड, हडपसर, कोंढवा, कात्रज भागात पाठविण्यात आले होते. आरोपी हडपसर येथे भेकराईनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस या भागात तळ ठोकून होते.

एन्जाॅय ग्रुपची (Enjoy Group) घोरपडे पेठ, लोणीकंद भागात दहशत असल्याने पोलिसांनी अवचरेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव लोणीकंद पोलिसांनी तयार केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव, सुधीर शिवले यांनी प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. साहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest