Pune : पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (Loksabha Election) २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क (state excise duty) पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली

State Excise Duty

पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (Loksabha Election) २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क (state excise duty)  पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या दोन महिन्यात २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune News) 

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ वारस गुन्ह्यांची नोंद व ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर व १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने असा २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल ४४२ प्रस्तावांपैकी २४८ जणांचे बंधपत्र घेण्यात आले असून ९७ लाख ७१ हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर ४१ प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले. 

१ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले. त्यामधील ४६८ आरोपीना अटक करुन  न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १७० आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना ५ लाख ८३ हजार १०० रूपये इतका द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.

अवैध मद्य व्यवसायात गुंतल्याबद्दल वारंवार गुन्हे नोंदविलेले तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरूद्ध एम.पी.डी.ए कायदा १९८१ अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल ४८ प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून १० आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परवानाकक्षा नमुना एफएल-३ अनुज्ञप्तीविरुद्ध एकूण २४९ नियमभंग प्रकरणे, त्यापैकी ३ निलंबन संख्या व ४४ लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

बिअर/वाईन शॉपी (एफएलबीआर-२) अनुज्ञप्तीविरुध्द ४४ नियमभंग प्रकरणे, १५ निलंबन संख्या,  ७ लाख ३० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून ४ आरोपींचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. किरकोळ अनुज्ञप्ती कक्षाबाहेरील तसेच रूफ टॉप विरूद्ध ३४ नियमबाह्य प्रकरणात कारवाई केलेली असून १७ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

 कारवाईसाठी १४ नियमित व ३ विशेष पथके तयार

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकुण १४ नियमित व ३ विशेष पथके तयार केली ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र. १८००२३३९९९ व दूरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest