सख्या भावांचा अल्पवयीन मुलीवर १५ दिवस बलात्कार, उद्या उरुळी कांचन बंदची हाक
दोन सख्या भावांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन गेल्या १५ दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच आई-वडिलांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात बुधवारी (दि. १२) संध्याकाळी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे उद्या उरुळी कांचन (दि. १५) बंदची हाक नागरिकांनी दिली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी नराधम इरफान शेख (मुजावर) व आयुब शेख (मुजावर) (रा.दोघेही, दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसरात राहत असलेली पीडित मुलीची आई मंगळवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करीत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसून आला. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसून आला. मात्र, मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला.
मुलीच्या आईने तिच्या अधिक चौकशी केली असता तिने सांगितले की, आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागील पंधरा दिवसांपासून तिच्यावर दोघेजण बलात्कार करत असल्याचे मुलीने सांगितले. धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी दोघांविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. मात्र, या प्रकारानंतर संतापलेल्या नागरिकांनी उद्या उरुळी कांचन बंदची हाक पुकारली आहे.