दलित सफाई कर्मचारी महिलेचा विनयभंग
लक्ष्मण मोरे
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत असलेल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून त्यांचा विनयभंग करण्यात आला. तसेच, या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी घडला होता.
ठेकेदार शिवाजी सुळ, आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ४० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिला ही गरीब कुटुंबातील आहे. ते मार्च २०२३ मध्ये कात्रज येथील त्रिमूर्ती चौक या परिसरामध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. महानगरपालिकेचा आरोग्य निरीक्षक असलेल्या मंगलदास माने याने या महिलेच्या असहायतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्या विधवा आणि अनुसूचित जातीच्या आहेत हे माहित असताना देखील त्यांचा गैरफायदा घेत त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली.
त्यांचा विनयभंग करण्यात आला. तसेच पैशांची देखील मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही महिला रजेवर गेली होती. १० एप्रिल २०२३ रोजी ही महिला सुट्टीवरून कामावर परत आली. त्यावेळी कामावर हजर होण्यासाठीची चिठ्ठी ठेकेदार असलेल्या शिवाजी सूळ याच्याकडून घेण्यासाठी त्या मुलासह गेल्या. त्यावेळी सूळ याने या महिलेला 'तू माने साहेबांकडे जा. तुम्ही जातीवरच जाणार' असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर या महिलेने सुळ आणि माने यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. हा तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी संजय वाघमारे नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकी दिली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.