संग्रहित छायाचित्र
पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. मागील सात महिन्यांच्या कालावधीत एक हजार ६८४ दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांनी दारु पिऊन गाडी चालवल्याचे ( ड्रंक अँड ड्राईव्ह ) पुणे पोलिसांना विविध कारवाई दरम्यान आढळून आले आहे. त्यामुळे आता या सर्वांचे तीन महिन्यासाठी वाहन परवाने रद्द होणार आहे.
पुण्यात गेल्या ६ महिन्यात १, ६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालविल्याबद्दल फक्त खटले दाखल केले जात होते. मात्र, यापुढे जर कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिन्यांसाठी रद्द केले जाईल. त्याने हाच गुन्हा पुन्हा केला तर ६ महिन्यांपर्यंत त्याचा परवाना रद्द होणार. तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार असल्याची माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली .
पवार म्हणाले, पुणे पोलिस विभागामार्फत शहरातील विविध भागात अनेक कारवाया करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दारू पिऊन वाहन चालवणार्या वाहन चालकावर सातत्याने कारवाई केली जात आहे. संबधीत चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल आरटीओ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वांचे तीन महिन्यासाठी वाहन चालविण्याचा परवाना रद्द होणार आहे ”
एखाद्या चालकाने दुसऱ्यांदा अशा स्वरूपाचा गुन्हा केलेला आढळून आल्यास सहा महिन्यांसाठी परवाना रद्द होईल. तिसर्यांदा त्याने तोच गुन्हा केल्यास परवाना कायमचा रद्द होणार आहे. त्यामुळे कोणत्याही दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालकाने दारू पिऊन वाहन चालू नये. तसेच कारवाईवेळी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी वर्गासोबत वाद घालू नये, असे आवाहनही पवार यांनी केले.