लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारी खाजगी बस ताम्हिणी घाटात उलटली
ताम्हिणी घाटात खाजगी बसला अपघात होवून ५ जणांचा मृत्यू तर २५ पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ही बस पुण्यातील लोहगाव येथून महाड मधील बिरवाडी येथे जात होती. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रथमिक महितीनुसार, रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर भीषण बस अपघात झाला. पर्पल (Purple) ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक MH14GU3405) पलटी झाली. या अपघातात पाच जणांनी जीव गमावल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात २५ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये २ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे.
या अपघातात संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव आणि एक अनोळखी पुरुष (ओळख पटवण्याचे काम सुरू आहे) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही दुर्दैवी अपघात आज सकाळी ९.३० ते ९.५० दरम्यान घडली. लोहगाव, पुणे येथील जाधव कुटुंबीय बिरवाडी, महाड येथे लग्नसमारंभासाठी जात असताना हा अपघात झाला. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली.
अपघातानंतर बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.