संग्रहित छायाचित्र
पोलिसांनी रात्री पायी गस्त घालीत असताना काळ्या काचांची गाडी तपासली असता बॉडी बिल्डर स्टेरॉईड घेताना त्यांना रंगेहात पकडले. वैद्यकीय कारणांशिवाय खासगी वापरास बंदी असलेले मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन घेत असताना या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक बाबुराव वाडेकर (वय ३२, रा. न्यू रेल्वे पोलीस मुख्यालय, औंध रोड, खडकी) आणि साजन आण्णा जाधव (वय २५, रा. आंबेडकर चौक, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार तेजस रमेश चोपडे यांनी फिर्याद दिली आहे.
वाडेकर हा बँकेच्या रिकव्हरीची कामे करतो. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजित बढे, पोलीस हवालदार तेजस चोपडे, पोलीस कर्मचारी प्रमोद मोहिते, पवार आदी गुरुवारी (दि. १९) रात्री सव्वा बाराच्या सुमारास शिवाजीनगरच्या नरवीर तानाजी वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना एका बोळात एक काळी कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे दिसले.
पोलिसांनी या कारजवळ जाऊन त्यांना हटकले. त्यावेळी वाडेकर हा गाडीच्या सीटवर बसून इंजेक्शन घेत असल्याचे पोलिसांच्या दृष्टीस पडले. पोलिसांना पाहताच त्याने इंजेक्शन खाली टाकून दिले. पोलिसांनी हे सर्व इंजेक्शन ताब्यात घेतले. त्याच्याकडे साधारणपणे १४ व्हायल आढळून आल्या असून यामध्ये साधारण ३०० इंजेक्शन होतात.
पोलिसांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांच्यामार्फत या औषधाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे या औषधाचे बिल नसल्याचे समोर आले. या औषधामुळे ते औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवितास किंवा आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. हे माहिती असतानाही हे इंजेक्शन जवळ बाळगून त्याचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अजित बढे करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.