पुणे: ‘बंदूकबाज’ पोलिसांच्या ‘निशाण्या’वर; सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर सतर्कता

हिंदी सिनेसृष्टीमधील अभिनेता सलमान खान याच्या घरावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. पुण्यात बेकायदा बंदूक, पिस्तूल आदी अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच गोळीबाराचे गुन्हे दाखल असलेल्या १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात ‘हजेरी’ घेण्यात आली.

Pune Police

पोलीस आयुक्तालयात १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांची पुन्हा ‘हजेरी’

पोलीस आयुक्तालयात १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांची पुन्हा ‘हजेरी’

हिंदी सिनेसृष्टीमधील अभिनेता सलमान खान (Firing at Salman Khan home) याच्या घरावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर पुणे पोलीस (Pune Police) सतर्क झाले आहेत. पुण्यात बेकायदा बंदूक, पिस्तूल आदी अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच गोळीबाराचे गुन्हे दाखल असलेल्या १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात ‘हजेरी’ घेण्यात आली. 

या गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव अथवा बेकायदा कृती न करण्याची तंबी देण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार या गुन्हेगारांची कानउघडणी करण्यात आली. शहरात कोणत्याही प्रकारच्या गोळीबाराच्या घटना घडू नयेत आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपींना यावेळी कडक कारवाईचा इशारा देण्यात आला. (Pune Crime News)

पोलिसांच्या माहितीनुसार, आगामी काळात कोणी गुन्हेगारी कृत्य करण्याचा विचार करत असेल, तर त्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळायला हवी. तसेच, पुण्यात कोणाकडे बेकायदा शस्त्रे असतील तर त्याचीही माहिती पोलिसांना दिली जावी. पोलिसांनी आरोपींकडून यावेळी गुन्हेगारांची संपूर्ण कुंडली मांडणारे ‘डोसीअर फॉर्म’ भरून घेण्यात आले. यासोबतच, गुन्हे शाखेकडून जेव्हा जेव्हा चौकशी अथवा हजेरीकरिता बोलावले जाईल त्यावेळी यावे लागेल, अशी ताकीद देण्यात आली. पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले  की, सलमान खानच्या घरावरील हल्ला झाल्यानंतर अशी घटना पुण्यात घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने आरोपींची शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली असून गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना सतर्क केले आहे.

पुण्यात मोठी शस्त्र कारवाई?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत मोठी कारवाई केली असून, त्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पिस्तूल बाळगणारे आरोपी सापडले आहेत. या आरोपींकडून २० ते २५ पिस्तुले सापडल्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वारजे येथे एका वाईन शॉपवर दरोडा टाकणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांचा समावेश आहे.  एका बड्या गुन्हेगाराचा ‘गेम’ वाजवण्यासाठी मोठा कट रचला गेल्याची माहिती तपासात समोर आली असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत

जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार ?

पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून झाडाझडती सुरू असताना आपल्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार एका तरुणाने पोलिसांकडे केली आहे. या तरुणाने आपल्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्यात आल्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. ही माहिती मिळताच परिमंडल एकचे उपायुक्त संदीपसिंह गील (DCP Sandeep Singh Gill) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जंगली महाराज रस्त्यावर धाव घेतली. या ठिकाणी पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, याविषयी उपायुक्त गील म्हणाले की, तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तपासणी आणि चौकशी करीत आहोत. हा प्रकार घडला आहे की नाही याविषयी आमचा तपास सुरू आहे. तपासाअंती याविषयी स्पष्टपणे बोलता येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest