Pune: हॉर्न वाजवल्याने चार दात पाडले

पुणे: मित्रासह चारचाकीमध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या रियल इस्टेट व्यावसायिकाला केवळ हॉर्न वाजवल्याच्या रागामधून तिघाजणांनी बेदम मारहाण केली. तोंडावर लाथ मारत

संग्रहित छायाचित्र

खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर १ जानेवारी रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली घटना

पुणे: मित्रासह चारचाकीमध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या रियल इस्टेट व्यावसायिकाला केवळ हॉर्न वाजवल्याच्या रागामधून तिघाजणांनी बेदम मारहाण केली. तोंडावर लाथ मारत त्यांचे चार दात पाडण्यात आले. ही घटना खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर १ जानेवारी रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अमित बबन जायभाय (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय शेगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जायभाय यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. १ जानेवारी रोजी पहाटे मित्रांसह मोटारीमधून फेरफटका मारण्यासाठी ते निघाले होते. साधारणपणे पावणे चारच्या सुमारास ते कोरेगाव पार्क, कल्याणीनगर लोहगाव रस्त्याने फिनिक्स मॉल येथून नगर रस्त्याने खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावरून जात होते. नगर रस्त्यावरील आदी मार्बल दुकानाजवळ आले असता त्यांच्या समोरील बाजूने एक मोटार वेडीवाकडी वळणे घेत रस्त्यावरून जात होती. या गाडीच्या दोन्ही दरवाजांमधून दोन मुले काचेमधून तोंड बाहेर काढून मोठ्या आवाजात ओरडत होती.

अपघाताची शक्यता वाटल्याने फिर्यादी जायभाय यांनी हॉर्न वाजवला. त्यामुळे आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. वाद नको म्हणून फिर्यादी तेथून निघून गेले. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर फिर्यादी चहा पिण्यासाठी थांबले. त्यांचा मित्र गाडीमध्येच झोपलेला होता. त्याचवेळी आरोपी तिघेजण तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात 'याला लई माज आलाय, लई हॉर्न वाजवतो, याला मारून टाका' असे म्हणत मारहाण  करण्यास सुरुवात केली. फिर्यादीला खाली पाडून त्यांच्या तोंडावर लाथ मारण्यात आली. त्यांच्या तोंडावर जोरात फटका बसल्याने जबड्यातील वरच्या बाजूचे तीन दात आणि खालील बाजूचा एक अर्धा दात पडला. त्यांना गंभीर जखमी करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पुढील तपास उपनिरीक्षक विजय शेगर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest