पुणे: वडिलांनीच रचला मुलाच्या खुनाचा कट; ‘लिव्ह इन’ मध्ये राहत असल्याने उडाले होते खटके!

मुलाने बायकोसोबत घटस्फोट घेतला आणि त्यानंतर तो एका तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. ही गोष्ट त्याच्या वडिलांना पटत नसल्याने मुलाशी सतत वाद होत होते. त्यातून संपत्तीवरूनही वाद झाले.

वडिलांनीच रचला मुलाच्या खुनाचा कट

जंगली महाराज रस्त्यावरील बांधकाम व्यावसायिकावरील गोळीबाराचा उलगडा,

मुलाने बायकोसोबत घटस्फोट घेतला आणि त्यानंतर तो एका तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. ही गोष्ट त्याच्या वडिलांना पटत नसल्याने मुलाशी सतत वाद होत होते. त्यातून संपत्तीवरूनही वाद झाले. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याने मुलगा वडिलांशी नीट बोलत नसे, शिवीगाळ, एकेरी भाषेत उल्लेख असे सुरू होते. याचा राग अनावर झाल्याने वडिलांनी पोटच्या मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

जंगली महाराज रस्त्यावर भरदुपारी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करून खून करण्याच्या प्रयत्न घडला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलीसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून आणि मुलाकडून मिळणाऱ्या हीन वागणूकीमुळे वडिलांनीच मुलाच्या खुनाची सुपारी दिली आणि त्यासाठी ७५ लाख दिले. यातील २५ लाख रुपये आधी दिले तर बाकीचे खून झाल्यानंतर दिले जाणार होते. ही माहिती या प्रकरणातील वडील बाळासाहेब शंकरराव अरगडे पाटील (वय ६४) यांनी पोलिसांना दिली. या कटात सहभागी असलेल्या आरोपींनाही पोलीसांनी अटक केली आहे. प्रशांत विलास घाडगे (वय ३८, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय ४८, रा. एरंडवणे), प्रवीण उर्फ पर्या तुकाराम कुडले (वय ३१, सुतारदरा), योगेश दामोदर जाधव (३९) व चेतन अरुण पोकळे (वय २७) या आरोपांनी अटक केली आहे. याप्रकरणी धीरज अरगडे पाटील  (३८) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. धीरज अरगडे हे बांधकाम व्यवसायिक आहेत.

पोलीसांच्या माहितीनुसार, बाळासाहेब यांनी आपल्या कार्यालयात काम करणाऱ्या कामगारासोबत मिळून खुनाचा कट रचला. त्यानुसार बाळासाहेब यांनी त्यांचा मुलगा धीरजच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यानुसार धीरजचा खुन करण्यासाठी त्याच्यावर पाळत ठेवली होती. जंगली महाराज रस्त्यावर अरगडे हाईट्स या इमारतीच्या खाली १६ एप्रिल रोजी भरदुपारी धीरजवर दुचाकीवरून स्विगीचे टीशर्ट, हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने पिस्तुल कॉक न झाल्याने गोळी झाडली गेली नाही.

जीपीएसद्वारे ठेवली नजर...

धीरजकडे चारचाकी गाडी आहे. धीरजचा खुन करण्यासाठी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्याचे लोकेशन कळावे, यासाठी त्याच्या चारचाकी गाडीला जीपीएस बसविण्यात आले होते. त्यानुसार धीरजवर पाळत ठेवण्यात येत होती. घटनेच्या दिवशीही तक्रारदार कार घेऊन ऑफिसमध्ये आल्याचे आरोपींना या जीपीएसद्वारेच समजले.

दहशतीचे वातावरण

धीरजचा खुन करण्यासाठी दोन पिस्टलचा वापर करण्यात आला होता. याच पिस्टलमधून सलग गोळीबार केल्याच्या घटना घडल्याने दहशतीचे वातावरण तयार झाते.  जंगली महाराज रस्त्यावरच गोळीबाराचा प्रयत्न झाल्याने या गुन्ह्याचा कसून तपास पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यावेळी युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती घेतली. त्यानुसार गुन्ह्याचा छडा लागला आहे. प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडले. त्यांच्या चौकशीत वडिलांची माहिती समोर आली. दरम्यान धीरजला मारण्यासाठी पंधरा दिवसापासून पाळत ठेवली होती. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार आण्णा माने, निलेश साबळे, अनिकेत बाबर, राजेंद्र लांडगे, अमोल आव्हाड यांच्या पथकाने केली आहे.

धीरजवर १० मार्च रोजी सुस रोडला चाकुने वार करण्यात आले होते. हे वार प्रवीण कुडले, चेतन पोकळे यांनी केले होते. सुदैवाने ते यातून बचावले. धीरज अरगडे यांच्यावर संपत्तीच्या वादातून दोनवेळा  हल्ला झाला. पण दोन्ही वेळा बचावले आहेत. पहिल्यांदा हल्ला चाकूने झाला. दोघांनी त्यांच्यावर वार केले. त्यानंतर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हादेखील पिस्तुल कॉक झाले नाही. त्यामुळे गोळी झाडली गेली नाही. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest