पुणे : ‘आयटी इंजिनियर’ तरुणीवर बलात्कार; महिला आयोगाने घेतली दाखल

‘मगरपट्टा सिटी’मधील एका ‘आयटी’ कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या महिला अभियंत्यावर बलात्काराचे (Rape) प्रकरण समोर आले आहे. एका सहकारी आयटी इंजिनियरनेच तिच्यावर बलात्कार केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Rape in Pune

‘आयटी इंजिनियर’ तरुणीवर बलात्कार; महिला आयोगाने घेतली दाखल

हडपसर पोलीस ठाण्यात सहकारी इंजिनियरवर गुन्हा दाखल

पुणे : ‘मगरपट्टा सिटी’मधील एका ‘आयटी’ कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या महिला अभियंत्यावर बलात्काराचे (Rape) प्रकरण समोर आले आहे. एका सहकारी आयटी इंजिनियरनेच तिच्यावर बलात्कार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिलेची तक्रार घेतली जात नसल्याने तिने थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली. महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अखत्यारीतील वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार मगरपट्टा सिटीमध्ये घडलेला असल्याने हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 

गौरव अशोक कौशल (वय ३०, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आयटी इंजिनियरचे नाव आहे. त्याच्यावर भादवि ३७६, ३७६ (२) (एन) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय पिडीत आयटी इंजिनियर तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी वाकड परिसरात राहण्यास आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते मे २०२३ या कालावधीदरम्यान मगरपट्टा सिटीमधील एका सोसायटीमध्ये घडला. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी मुळची नागपूरची आहे. ती मागील काही वर्षांपासून पुण्यात राहण्यास आहे. तर, आरोपी गौरव कौशल हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून सध्या मगरपट्टा सिटीमधील डेफोडिल्स नावाच्या सोसायटीत राहतो. हे दोघेही एकाच आयटी कंपनीत नोकरी करतात. एकत्र नोकरी करीत असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. गौरव याने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला वेळोवेळी भूलथापा देऊन जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. 

त्यानंतर, पिडीत तरुणीने राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार अर्ज केला. महिला आयोगाने या अर्जाची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश आयोगाने पोलिसांना दिले. ही तरुणी वाकड परिसरात राहण्यास असल्याने आयोगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला याबाबत आदेश दिले. त्यानुसार, वाकड पोलिसांनी तक्रार अर्ज आणि तरुणीच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला. मात्र, हा सर्व प्रकार पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मगरपट्टा सिटीमध्ये घडलेला असल्याने वाकड पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी कागदपत्र प्राप्त होताच गुन्हा नोंदवून घेतला आहे. दरम्यान, फिर्यादी यांचा हडपसर पोलीस ठाण्यात अद्याप जबाब झालेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यासोबतच आरोपीचा शोध देखील सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

याबाबत तपास अधिकारी तथा सहायक निरीक्षक दीपक बर्गे म्हणाले, की पिडीत तरुणी आयटी इंजिनियर आहे. तर, आरोपी तिचा सहकारी आहे. पिडीत तरुणीने याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. महिला आयोगाने याबाबत पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे. आमचा याप्रकरणी तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest