‘वीणा वर्ल्ड’च्या निष्काळजीपणामुळे कुटुंब उद्ध्वस्त
पिंपरी चिंचवड: प्रतीथयश ट्रॅव्हल्स कंपनी ‘वीणा वर्ल्ड’च्या निष्काळजीपणामुळे भोसरीतील एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. लेह येथे फिरायला गेलेल्या पर्यटकाची प्रवासादरम्यान अचानक प्रकृती खालावली. मात्र, त्याला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. (Pune News)
पत्नीने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर ‘वीणा वर्ल्ड’च्या टूर मॅनेजरसह दोघांवर लेह पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी गंगाधर गांगर्डे (वय ४४) असे मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नाव आहे. त्यांची पत्नी तारामती गांगर्डे (रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
वीणा पाटील हॉस्पिटॅलिटी आर्या हॉलिडेजचा टूर मॅनेजर धीरज चौधरी, परस्पर गोळी देणारे पर्यटक डॉ. अमितकुमार जैन (रा. लालबाग, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी धीरज चौधरी आणि डॉ. अमितकुमार जैन या दोघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी लेह पोलिसांकडे पाठविण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘‘शिवाजी गांगर्डे आणि तारामती गांगर्डे हे मे २०२२ मध्ये लेह येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी गांगर्डे यांचे काही परिचित बरोबर होते. पर्यटनासाठी जाण्याकरिता भोसरी स्पाईन रोड येथील आर्या हॉलिडेज यांच्याकडे पाच दिवस आणि सहा रात्रीचे लेह-लडाख, नुब्रा-पॅंगॉंग असे बुकिंग केले होते. आर्या हॉलिडेज हे वीणा वर्ल्डचे एजंट आहेत. गांगर्डे यांनी लेह पर्यटनासाठी प्रत्येकी ५५ हजार ७०० रुपये आणि विम्याचे २ हजार असे एकूण १ लाख १५ हजार ४०० रुपये भरले होते.
१६ मे २०२२ रोजी सर्व जण पुण्यातून मुंबईकडे जाऊन तेथून दुसऱ्या दिवशी विमानाने लेह येथे पोहोचले. पुढील दोन दिवस लेह येथे सर्व पर्यटक फिरले. १९ मे रोजी रात्री आराम करत असताना अचानक शिवाजी गांगर्डे यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. तारामती गांगर्डे यांनी टूर मॅनेजर धीरज चौधरी यांना याची कल्पना दिली. चौधरी यांनी पहाटे गांगर्डे यांना दवाखान्यात नेले, परंतु डॉक्टर नसल्यामुळे ते पुन्हा त्यांना हॉटेलमध्ये घेऊन आले.
त्यानंतर चौधरी यांनी गांगर्डे यांना खोकल्याचे पातळ औषध दिले. मात्र शिवाजी गांगर्डे यांची तब्येत खालावली असल्याने पुढील ट्रिपसाठी आम्ही येत नाही असे तक्रारदार तारामती गांगर्डे यांनी चौधरी यांना सांगितले. परंतु हॉटेलचे बुकिंग संपल्याने तुम्हाला आमच्यासोबत पुढील प्रवासासाठी यावेच लागेल, असे चौधरी यांनी गांगर्डे यांना सांगितले. तसेच तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका, ते तुम्हाला ॲडमिट करून घेतील, असे सांगितले. त्यामुळे गांगर्डे यांना चौधरी यांच्याबरोबर पुढील प्रवासासाठी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नुब्रा येथे गेल्यावर गांगर्डे यांना खोकल्याचा जास्त त्रास होऊ लागला. याबाबत तारामती गांगर्डे यांनी याची कल्पना चौधरी यांना दिली. शिवाजी यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, चौधरी यांनी शिवाजी यांना हॉस्पिटलमध्ये न नेता पर्यटनासाठी आलेले आणि डॉक्टर असलेल्या अमितकुमार जैन यांच्याकडून औषधाची एक गोळी घेऊन ती शिवाजी गांगर्डे यांना दिली. मात्र या गोळीने काही फरक पडला नसल्याचे तारामती गांगर्डे यांचे म्हणणे आहे. या गोळीनंतर शिवाजी गांगर्डे यांचा त्रास वाढला. याची कल्पनादेखील टूर मॅनेजर चौधरी आणि डॉक्टर जैन यांना तारामती गांगर्डे यांनी दिली होती. परंतु ‘‘गोळी जास्त पॉवरची आहे. त्यामुळे त्याची गुंगी आली असेल. ते सकाळपर्यंत ठीक होतील,’’ असे चौधरी यांनी तारामती गांगर्डे यांना सांगितले होते.
त्यानंतर शिवाजी गांगर्डे हे जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ मे रोजी सकाळी सहा वाजता शिवाजी गांगर्डे यांच्या तोंडातून फेस आल्याचे तारामती गांगर्डे यांच्या लक्षात आले. तसेच त्यांचे शरीर थंडगार पडले होते; हे पाहून तारामती गांगर्डे यांनी आरडाओरडा करून इतर पर्यटकांना आणि चौधरी यांना तेथे बोलावले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या चौधरी यांनी शिवाजी गांगर्डे यांना नजीकच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र उपचारापूर्वीच शिवाजी गांगर्डे यांचा मृत्यू झाल्याचे त्यातील डॉक्टरांनी घोषित केले. ‘‘रात्रीच आणले असते तर कदाचित रुग्णाचे प्राण वाचले असते,’’ असे तेथील डॉक्टरांनी तारामती गांगर्डे यांना सांगितल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शिवाजी गांगर्डे यांचे शिवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह तारामती गांगर्डे यांच्याकडे देण्यात आला. त्याचबरोबर तेथे आलेल्या स्थानिक पोलिसांनी याबाबतची प्राथमिक चौकशी केली. चौधरी याला तारामती गांगर्डे यांच्याबरोबर थांबण्यास सांगितले. परंतु टूर मॅनेजर चौधरी हा त्यांच्याबरोबर न थांबता पुढील प्रवासासाठी निघाला. तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांनी चौधरी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने एका सहकाऱ्याला तारामती गांगर्डे यांच्याबरोबर थांबण्यास सांगून तो अन्य पर्यटकांना घेऊन पुढील प्रवासासाठी निघून गेला. शिवाजी गांगर्डे यांचा मृतदेह आणि तारामती गांगर्डे यांच्यासह चौधरी याचा सहकारी विमानतळावर आला. मात्र तेथे गेल्यावर गांगर्डे यांचे तिकीट दुसऱ्या दिवशीचे असल्याचे सांगण्यात आले. मृतदेह घेऊन रात्रभर विमानतळावर कसे थांबायचे, असा सवाल तारामती गांगर्डे यांनी अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्याच दिवशीचे तिकीट देऊन शिवाजी गांगर्डे यांचा मृतदेह आणि तारामती गांगर्डे यांना पुण्याच्या दिशेने पाठवले. एक विमान बदलून हे सर्वजण पुण्यात आले. पुण्यात पोहोचण्यापूर्वी आमच्या कंपनीचे लोक तुमच्या मदतीसाठी विमानतळावर असतील, असे त्यावेळी चौधरी यांनी तारामती गांगर्डे यांना सांगितले होते. मात्र पुण्यात आल्यानंतर गांगर्डे यांच्या मदतीकरिता कोणीच उपस्थित नव्हते.
शिवाजी गांगर्डे यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार केल्यानंतर तारामती गांगर्डे यांनी याबाबत भोसरी पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन वीणा वर्ल्ड, आर्या हॉलिडेज आणि शिवाजी गांगर्डे यांना वेळेवर उपचार मिळवून देण्यास कुचराई करणाऱ्या चौधरीसह परस्पर एक गोळी देणारा डॉक्टर जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सर्व घटना लेह येथे घडली असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांना याबाबत गुन्हा दाखल करण्यास तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याबाबत लेह पोलिसांशी संपर्क करून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. परंतु, लेह पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे भोसरी पोलिसांनी अखेर सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर स्वतःच पिंपरी-चिंचवड येथे २० जून २०२३ रोजी गुन्हा दाखल केला.
मात्र घटना लेह येथे घडली असल्याने हे प्रकरण पुढील तपासाकरिता लेह येथे पाठवण्यात आले. परंतु तांत्रिक कारण पुढे करीत लेह पोलिसांनी भोसरीत दाखल झालेल्या गुन्हा तपास करण्याबाबत काही अडचणी असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांना कळविले. मे २०२२ पासून पाठपुरावा करत असलेल्या तारामती गांगर्डे या सर्व प्रकारानंतर हवालदिल झाल्या होत्या. दोन मुली आणि लहान मुलासह त्या वारंवार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत होत्या. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी अखेर जानेवारी २०२४ पहिल्या आठवड्यात पुन्हा लेह पोलीस दलाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर ८ जानेवारी २०२४ मध्ये लेह पोलिसांनी या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करीत या सगळ्याचा तपास आता सुरू केला आहे. याबाबत फोनवरून तारामती गांगर्डे यांचे म्हणणे नोंदवून घेतले जात आहे. त्याचबरोबर भोसरी पोलिसांकडून नोंदवण्यात आलेला गुन्हा आणि तारामती गांगर्डे यांचा जबाब लेह पोलीस तपासासाठी उपयोगात आणत आहेत.
शिवाजी गांगर्डे यांचा निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याकारणाने वीणा वर्ल्ड यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये दावादेखील दाखल केला आहे.
- तारामती गांगर्डे, तक्रारदार.
लेह केंद्रशासित प्रदेश झाल्याकारणाने पिंपरी-चिंचवड येथे दाखल गुन्हा पुन्हा नव्याने कसा दाखल करायचा, असा तांत्रिक प्रश्न लेह पोलिसांकडून उपस्थित केला गेला होता. याबाबत मी आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेह पोलिसांच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तेथे आता स्वतंत्र गुन्हा दाखल करून भोसरी येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचा आधार घेत तपास सुरू झाला आहे.
- शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.