पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करून पळून जाणारा आरोपी २४ तासात जेरबंद
पुणे : २२ डिसेंबर रोजी पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न करून करून पळून जाणाऱ्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने २४ तासांच्या आत जेरबंद केले. कैलास गणपत जाधव (वय ४४ वर्षे) याने आपल्या पत्नी पद्मिनी कैलास जाधव (वय ४० वर्षे) हिला घरगुती वादातून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. ही घटना वाघोली गावच्या केसनंद फाटा येथे घडली. वाघोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता.
आरोपी घटनेनंतर पळून गेला होता. मात्र जखमी महिलेची प्रकृती गंभीर आहे. त्या बेशुद्ध अवस्थेत आहेत. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी युनिट ६ च्या पथकाला तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले.
तांत्रिक तपासावरून आरोपी पुणे स्टेशनवरून झेलम एक्सप्रेसने निघाल्याचे उघडकीस आले. युनिट ६ च्या पथकाने लोहमार्ग पोलिस आणि मनमाड रेल्वे स्थानकाच्या पोलिसांशी समन्वय साधून मनमाड स्थानकावर आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पो. निरी. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, संभाजी सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपूरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.