संग्रहित छायाचित्र
पुण्यातील वाघोली परिसरात मद्यधुंद अवस्थेत डंपर चालवणाऱ्या चालकाने फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना २३ डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास वाघोली चौकात घडली. अपघातानंतर जखमींना तातडीने आयमॅक्स रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत व्यक्तींचे मृतदेहही ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
डंपर (MH 12 VF 0437) चालक गजानन शंकर तोट्रे (वय २६, राहणार नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल विनोद पवार (वय २२, अमरावती), वैभवी रितेश पवार (वय १) , वैभव रितेश पवार (वय २) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
तर, जानकी दिनेश पवार (वय २१), रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नागेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), अलिशा विनोद पवार (वय ४७) हे सहा जण या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मजूर आहेत. रविवारी रात्री कामासाठी अमरावतीहून पुण्यात आलेल्या या लोकांनी फुटपाथवर झोपण्याचा निर्णय घेतला होता. एकूण १३ जण फुटपाथवर होते. डंपरच्या धडकेत नऊ जण चिरडले गेले. यामुळे वाघोली परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.