वरिष्ठ डॉक्टरने केला लैंगिक छळ
वरिष्ठ डॉक्टरने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती देणारी निनावी पोस्ट एका शिकाऊ महिला डॉक्टरने सोशल मीडियावर टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या पोस्टची गंभीर दखल घेतली असून, तक्रारदार महिला डॉक्टर कोण आणि आरोप करण्यात आलेले डॉक्टर कोण याची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मात्र, ज्या डॉक्टरवर हे आरोप करण्यात आले त्याचे नाव लिहिण्यात आलेले नाही. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करणारी शिकाऊ महिला डॉक्टर कोण हे देखील समजू शकलेले नाही. वायसीएम हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरने वांरवार लैंगिक छळ केला. जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडले. सतत या गोष्टी घडत आहेत, अशा आशयाची पोस्ट एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीन दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर यावर 'मी-टू' मोहीम म्हणत लाखो लोक त्यावर व्यक्त झाली आहेत. दोन दिवसांनंतर या पोस्टचे स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲपवर व्हायरल करण्यात आले आहेत. वायसीएम हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी आलेल्या एका शिकाऊ डॉक्टरने ही पोस्ट केल्याचे कालांतराने उघडकीस आले आहे. मात्र याबाबत खातरजमा झालेली नाही. तसेच ज्या वरिष्ठ डॉक्टरबाबत ही पोस्ट असल्याचे सांगितले जात आहे त्याला देखील कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
विशेष म्हणजे दोन दिवसांनंतर ही सोशल मीडियावरील पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. मात्र त्यावर नेटिजन्स व्यक्त झालेले मेसेज डिलिट झालेले नाहीत. वायसीएम हॉस्पिटलमध्ये असलेले विभाग प्रमुख, हॉस्पिटल प्रमुख, वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अथवा आयुक्त आणि पोलीस यांच्याकडे याबाबत लेखी-तोंडी अशी कोणतीच तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर निनावी तक्रारींची दखल घेण्यात येऊ नये असा शासनाचा अध्यादेश आहे. विशेष म्हणजे ही तक्रार सोशल मीडियावर करण्यात आली होती. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून कारवाई होईल का, अशी शंका उपस्थित करणारी पोस्टदेखील व्हायरल झाली.
परंतु यामुळे एकूणच वायसीएम हॉस्पिटलच्या कारभारावर आणि तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांवर आरोप होत असल्याकारणाने प्रशासनाने या सगळ्याची दखल घेतली आहे. याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून आठ दिवसांच्या आत अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. आरोप करण्यात आलेले डॉक्टर कोण आणि तक्रार करणारी महिला डॉक्टर कोण याबरोबरच असा प्रकार घडला आहे का याबाबतचा अहवाल सादर होणार आहे.
विशाखा समिती घेणार शोध
अतिवरिष्ठ महिला वैद्यकीय अधिकारी, विशाखा समितीचे सदस्य यांच्याकडून या सोशल मीडिया पोस्टच्या आणि एकंदरीत घटनेच्या मुळाशी जाणार आहेत. आम्ही याबाबत गंभीर दखल घेतली असून, असा प्रकार खरंच घडला आहे का, हे पाहण्याबरोबरीनेच असे प्रकार घडू नयेत. तसेच अशा प्रकारे बदनामी होऊ नये यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.