Pimpri Chinchwad: वाकड पोलिसांचीअजब करामत; सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या कलमाखाली दाखल केला गुन्हा

पिंपरी चिंचवड: पत्नीला पुरुषाची मालमत्ता मानणारे भारतीय दंड विधान संहितेतील कलम ४९७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द करूनही पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील वाकड पोलीसांनी या

Pimpri Chinchwad: वाकड पोलिसांचीअजब करामत; सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या कलमाखाली दाखल केला गुन्हा

लॉजमध्ये पत्नीला प्रियकरासोबत निर्वस्त्र पकडल्याची केली होती तक्रार, पत्नीला पतीची मालमत्ता मानणारे कलम ४९७ घटनापीठाकडून २०१८ मध्ये रद्द

पिंपरी चिंचवड: पत्नीला पुरुषाची मालमत्ता मानणारे भारतीय दंड विधान संहितेतील कलम ४९७ सर्वोच्च न्यायालयाने रद्द करूनही पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील वाकड पोलीसांनी या कलमाखाली गुन्हा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत विवस्त्रावस्थेत एका लॉजमध्ये शारीरिक संबंध ठेवत असताना पकडल्याची तक्रार पतीने केल्यावर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला. (Section 497)

 पूर्वी भारतीय दंड विधान संहितेमध्ये कलम ४९७ खाली व्यभिचार हा गुन्हा ठरवलेला होता. या कलमानुसार एखादी स्त्री दुसऱ्या व्यक्तीची पत्नी आहे असे ज्ञात असताना आणि अशा व्यक्तीच्या संमतीशिवाय त्या व्यक्तीच्या पत्नीसोबत ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार ठरत नसला तरी व्यभिचार असून अशा गुन्हेगारास पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद होती. मात्र असा गुन्हा घडण्यासाठी अशा स्त्रीला गुन्हा घडण्यास प्रवृत्त केले म्हणून शिक्षा करता येत नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कलम ४९७ हे पत्नीला पतीची मालमत्ता म्हणून अधिकार प्रदान करत असल्यामुळे ते घटनेच्या समानतेच्या तत्त्वाचा भंग करत असल्याचे मत नोंदवले. कारण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या पीडित पत्नीला यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर ४९७ हे दुसऱ्या बाजूने पुरुषांसाठीदेखील भेदभाव करणारे होते. म्हणजे व्यभिचारामध्ये पुरुष आणि स्त्री हे दोघेही जबाबदार असताना त्यामध्ये फक्त पुरुषालाच शिक्षा करण्याची तरतूद होती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे कलम ४९७ ला वैध ठरवणारे आपले निर्णय फिरवत या कलमाला रद्द ठरवले आहे. तरीही वाकड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केल्याने त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. (Wakad Police)

२८ डिसेंबरला वाकडमधील एका लॉजमध्ये हा प्रकार घडला होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने पतीने बाहेरगावी जाण्याचा बहाणा करून तिच्यावर पाळत ठेवली. ती घरातून बाहेर पडल्यावर लॉजपर्यंत पाठलाग केला. लॉजमध्ये प्रियकरासोबत असताना दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही निर्वस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध ठेवत असतानाच पकडले. त्याची तक्रार दिल्यावर पोलीसांनी कलम ४९७ प्रमाणे व्यभिचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एका व्यावसायिकाला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने बाहेरगावी जात असल्याचा बहाणा करून पत्नीवर पाळत ठेवली. पत्नी घराच्या बाहेर पडल्यावर त्याने पाठलाग सुरू केला. ती वाकडमधील एका लॉजवर आली. त्यानंतर तिचा प्रियकरही तेथे आला. त्यानंतर दहा- पंधरा मिनिटांनी पतीने आपल्या मित्राच्या सोबतीने लॉजचा दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यावर पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेही निर्वस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध ठेवत असल्याचे पतीला दिसले. यावरून त्याने पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक मकसुद मणेर यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. कलम ४९७ कलमाखाली हा गुन्हा दाखल केल्याचे मणेर यांनी 'सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर,  न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड़ आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या पाच सदस्यीय घटनापीठाने २०१८ मध्ये कलम ४९७ घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते. त्यामुळे या कलमाखाली कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही.

- ॲॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ

पतीने पत्नीला व्यभिचार करताना पकडल्यास पती त्याचा वापर घटस्फोट मागण्यासाठी करू शकतो. परंतु, या संदर्भात पोलीस गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या कलमाखाली दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

- ॲॅड. असिम सरोदे, ज्येष्ठ विधिज्ञ

 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest