खाया- पिया कुछ नही, पण खिशातले गेले ४ लाख

झोमॅटोवरून आलेले पार्सल परत केल्यानंतर आयटी कंपनीच्या मॅनेजरला साडेबारा लाख रुपये पाठवल्याचे भासवून ते परत घेण्याच्या नावाखाली ४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हिंजवडीमधील एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर असलेल्या निमिश सुशीलकुमार सिंघल (वय ५१, रा. वाकड, मूळ गाव लखनऊ) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 13 Jun 2023
  • 08:22 am
खाया-पिया कुछ नहीं, पण िखशातले गेले ४ लाख

खाया- पिया कुछ नही, पण खिशातले गेले ४ लाख

'झोमॅटो' चे पार्सल परत केल्यानंतर साडेबारा लाख रुपये पाठवून ते परत घेताना आयटी क्षेत्रातील तरुणाला ४ लाखांचा गंडा

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

झोमॅटोवरून आलेले पार्सल परत केल्यानंतर आयटी कंपनीच्या मॅनेजरला साडेबारा लाख रुपये पाठवल्याचे भासवून ते परत घेण्याच्या नावाखाली ४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हिंजवडीमधील एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर असलेल्या निमिश सुशीलकुमार सिंघल (वय ५१, रा. वाकड, मूळ गाव लखनऊ) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सिंघल यांनी झोमॅटोवरून पार्सल मागवले होते. त्यातील एक पार्सल त्यांनी परत केले होते. त्याचे पैसे परत न आल्याने सिंघल यांनी 'कस्टमर केअर'ला फोन केला होता. त्यानंतर त्यांना तुमचे पैसे परत मिळतील आणि त्यासाठी पुन्हा संपर्क करण्यास सांगण्यात आले.  मात्र, त्यानंतर सिंघल यांच्या बँक खात्यावर अचानक १२ लाख ५० हजार २८१ रुपये जमा झाल्याचा 'एसएमएस' आला. त्यामुळे सिंघल यांनी एवढी रक्कम कशी जमा झाली विचारायला पुन्हा 'कस्टमर केअर'ला फोन केला, तेव्हा तुम्हाला एक लिंक पाठवतो असे सांगण्यात आले.

संबंधित व्यक्तीने लिंक पाठवल्यावर सिंघल यांनी त्या लिंकवर क्लिक करून त्यावर आलेला ओटीपी कस्टमर केअरद्वारे बोलत असल्याचे सांगणाऱ्याला दिला. खात्यावर जमा झालेली रक्कम परत काढून घेण्याच्या बहाण्याने सिंघल यांचे स्वतःचे ४ लाखही आरोपींनी टप्याटप्याने काढून घेतले.

बँक खात्यावर आलेली साडेबारा लाखांची रक्कम परत जात असताना सिंघल यांना स्वतःचे पैसे गेल्याचे समजताच त्यांनी  पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, सिंघल यांच्या खात्यावर खरंच साडेबारा लाख रुपये जमा झाले होते का? त्यांना पाठविण्यात आलेला एसएमएस कस्टमर केअर असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने पाठविला की तो खोटा होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दररोज पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे सायबर क्राईमअंतर्गत सरासरी पाच प्रकरणे येतात. त्यातही बहुतांश फसवणूक झालेल्या व्यक्ती उच्चशिक्षित आहेत. आयटी अभियंत्यांची ऑनलाईन फसवणूक होण्याच्या प्रकारात गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील २० गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास सर्व तक्रारदार उच्चशिक्षित असून, त्यांचे प्रबोधन करण्याची वेळ आता पोलिसांवर आली आहे.

मॅट्रिमोनिअल साईटवरून लग्नाच्या बोलणीला सुरुवात करून, गिफ्ट पाठविताना ते कस्टमने पकडले असल्याचे सांगत ८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा नवा प्रकार पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू अशा, कुणाल आयकॉन सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीसोबत घडला आहे. त्यानंतर आता पुन्हा हिंजवडी भागात नोकरी करणारे आणि वाकड येथे राहणाऱ्या आयटी अभियंत्यांचे कामकाजाचे नियोजन करणाऱ्या मॅनेजरला गंडा घातला गेला आहे.

बँकेकडून येणारे एसएमएस कोणत्या स्वरूपाचे असतील हे बँकेकडून स्पष्ट करण्यात येत असते. सिंघल यांच्या प्रकरणात खरंच बँक खात्यात पैसे जमा झाले होते का? हे तपासण्याचे काम सर्वप्रथम केले जाणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही स्वरूपाची लिंक आल्यानंतर त्यावरील पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी खातरजमा करावी, असे आवाहन हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest