पुणेकर भयकंपित ! आंदेकर खुनानंतर प्रतिस्पर्धी गटांच्या समाजमाध्यमांवर बदला घेण्याच्या धमक्या
शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले सभ्य-सुसंस्कृत पुणे पाठोपाठच्या हत्यासत्रांमुळे भयकंपित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येने टोळीयुद्धाला तोंड फुटले असून परस्परांचे शत्रू असलेले प्रतिस्पर्धी गट निर्लज्जपणे समाजमाध्यमांवर उघड-उघड बदला घेण्याच्या धमक्या देत आहेत. लागोपाठचे खून, हल्ले, मारामाऱ्यांमुळे पुणे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश उघड्यावर आले असून त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. खून, हिंसा, मारामाऱ्यांमुळे पुण्यात दहशतीचे वातावरण आहे. (Vanraj Andekar murder)
एक मजबूत-सक्षम सायबर सेल, स्थानिक गुप्तचर शाखा आणि कार्यक्षम गुन्हे शाखा असल्याचा दावा करणाऱ्या आणि त्यांच्या सक्षमतेचा अभिमान बाळगणारे पुणे पोलीस वाढती गुन्हेगारी आणि उघड हिंसाचार रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्था सुरळीत आहे का, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. बंदुका, पिस्तूल आणि कोयत्यासारखी धारदार शस्त्रे घेऊन गुन्हेगार दहशत पसरवतानाच्या चित्रफितींमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune gang war)
दिवंगत वनराज आंदेकरच्या टोळीचे सदस्य समाजमाध्यमांवर उघडपणे आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याची आणि सूड उगवण्याची धमकी देत आहेत. त्यांनी आपल्या समाजमाध्यम खात्यांवर ठेवलेली 'स्टेटस' आणि 'स्टोरीं'मधून दुसऱ्या टोळीयुद्धाचे संकेत मिळत आहेत. कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी अधिकारी ठोस कारवाई करणार का, असा प्रश्न भयभीत पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे. भयाच्या सावटाखाली सर्वसामान्य नागरिक आपले जीवन कंठत आहे. टोळीयुद्धाद्वारे होणारा संभाव्य रक्तपात रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी घेत पोलीस यंत्रणेने खडबडून जागे होण्याची गरज आहे. या समाजकंटकांवर त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज आहे. टोळीयुद्ध रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरून (सोशल मीडिया हँडल) ते सूड उगवण्याच्या तयारीत असल्याचे 'रील्स' आणि पोस्ट टाकत असल्याचे दिसत आहे. पुणे सायबर पोलीस मात्र अशा 'रिल्स' पोस्ट करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू शकलेले नाहीत.
चार दिवस हिंसेचे
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर याची २ सप्टेंबर रोजी नाना पेठेत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी वनराजच्या दोन बहिणी संजीवनी आणि कल्याणी, मेहुणा जयंत आणि गणेश कोमकर आणि बंडू आंदेकरचा प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड यांच्यासह १५ आरोपींना अटक केली आहे. त्याच दिवशी म्हणजे २ सप्टेंबर रोजी एका वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक वासुदेव कुलकर्णी यांच्यावर घराजवळ रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला करून, हत्या केली. बुधवारी पुन्हा जुन्या वादातून सिंहगड रस्त्यावर १८ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गुलटेकडी परिसरात ४ सप्टेंबर रोजी सुनील सरोदे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती.
आमच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. गुन्हे शाखेचे प्रत्येक पथक दररोज २५ गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्हेगारीचा इतिहास तपासून पाहात आहे. आमचे पथक शहराबाहेरून आलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या अड्ड्यांवर, मुक्कामस्थळी भेट देत आहेत. आम्ही जामिनावर बाहेर असलेल्या आणि शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांची अद्ययावत यादी तयार करत आहोत.
- निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे)
पोलीस 'व्हीआयपीं'च्या सुरक्षेत, कायदा-सुव्यवस्था टांगणीवर
सतत घडत असलेल्या गुन्ह्यांमुळे आणि त्यांच्या ध्वनिचित्रफितींमुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही चिंतेचे वातावरण आहे. पुण्याच्या रस्त्यांवर पोलिसांचे अस्तित्वच दिसत नाही. ठिकाण ठिकाणचा बंदोबस्त शिथील पडल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार याबाबत 'सीविक मिरर'शी बोलताना म्हणाले, हिंसा आणि गुन्हेगारी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यांवर पोलिसांचा वावरच नाही. तसेच परिसरात गस्तीचाही अभाव आहे. पोलिसांच्या उपस्थितीमुळे गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकते. मात्र सध्या पोलीस 'व्हीआयपी' बंदोबस्तात व्यग्र आहेत. त्यांना दंड वसुलीचे 'टार्गेट' दिले जाते. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याचे नाही. तसेच सक्षम गुप्तचर यंत्रणा नसणे आणि माहिती स्रोताच्या खबऱ्यांंच्या जाळ्यांचा अभाव आहे.”
वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आम्ही कठोर कारवाई केली आहे. प्रत्येक आरोपीची अवैध बांधकामे लवकरच पाडली जातील. आरोपींना मदत करणाऱ्यांवर आश्रय देण्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल केला जाईल."
- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त