भोसरीमधील जगताप टोळीवर मोका

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत भोसरीमधील जगताप टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे

संग्रहित छायाचित्र

जगताप टोळीतील आरोपींवर १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद, हिंसाचाराचा वापर करून वाढवले वर्चस्व

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत भोसरीमधील जगताप टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. टोळीप्रमुख आदर्श उर्फ कुक्या गोविंद जगताप (वय २२, रा. आदर्शनगर, मोशी, पुणे), सुनील राणोजी जावळे (वय २६, रा. आदर्शनगर, मोशी, पुणे), रोहित उर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (वय १९, रा. आळंदी रोड, भोसरी, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे केल्याचे समोर आले. जगताप टोळीतील आरोपींवर भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर १३ गुन्हे दाखल आहेत.

टोळीमधील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव भोसरी पोलिसांनी पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मोकाअंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात आठ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ३९ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुका भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर लक्ष ठेऊन प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ एक) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, उपनिरीक्षक श्री शेख, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest