Pune Crime : जयश्री हॉटेलच्या मालकावर प्राणघातक हल्ला

टिळक रस्त्यावरील जयश्री पावभाजी या हॉटेलच्या मालकावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.

Jayashree hotel

जयश्री हॉटेलच्या मालकावर प्राणघातक हल्ला

हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याचा राग; दोघाजणांना पर्वती पोलिसांकडून अटक

पुणे : टिळक रस्त्यावरील जयश्री पावभाजी या हॉटेलच्या मालकावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे. हॉटेल बंद करून साफसफाई सुरू असताना आलेल्या आरोपींनी जेवणाची मागणी केली. हॉटेल बंद झाल्याचे सांगितल्यानंतर चिडलेल्या आरोपींनी हत्यार घेऊन हल्ला चढवला. न्यायालयाने या दोघांनाही २९ डिसेंबरपर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे. (Jayashree hotel)

शुभम प्रमोद शिंदे (Shubham Shinde) आणि ओंकार शिंदे (Omkar Shinde) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीविरुद्ध ३०७, ३२३, ५०४, ५०६ / २, क्रीमीनल लॉ अमेंडमेन्ट ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७/१, १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यशराज सुभाष भोसले (वय २९, रा. रोहन कृतिका सोसायटी, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.  तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले हे जयश्री पावभाजी हॉटेलचे मालक आहेत. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास ते हॉटेल बंद करून स्वच्छता करीत होते. त्यावेळी आरोपी शुभम आणि ओंकार तेथे आले. त्यांनी कामागारांसोबत वाद घालायला सुरुवात केली. भोसले यांनी मध्यस्थी करीत या दोघांना काय वादाचे कारण विचारले.

त्यावेळी आरोपींनी 'जेवण मिळेल का?' अशी विचारणा केली. भोसले यांनी जेवण संपले असून हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. त्यावरून चिडलेल्या आरोपींनी त्यांच्याशी देखील वाद घालायला सुरुवात केली. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. शिवीगाळ करीत ओंकार याने त्याच्याकडे असलेल्या हत्याराने वार केले. त्यांना गंभीर जखमी करून कामगारांना मारहाण केली. कोणी मध्ये आले तर खलास करून टाकीन अशी धमकी दिली. तसेच, आरडाओरडा करीत दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक युवराज पाटील करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest