Pune News : पानपट्ट्यांवर राजरोस विकला जातोय कॅन्सर : पुण्याच्या परिसरात नशेच्या पानाची क्रेझ; पानपट्ट्यांवर दारूच्या बाटल्यांएवढी नशा येणाऱ्या पानांची विक्री

पुण्याच्या उपनगरामध्ये आणि आता पुण्याला लागून असलेल्या गावांमध्ये नशेचा एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे 'नशायुक्त पान' ! हे पान खाणाची तरुणांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Jan 2025
  • 08:00 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गणेश खंडाळे

पुण्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग पेडलर्स जाळे पसरलेले आहे. ललित पाटील प्रकरणात ड्रग्ज केस संदर्भात मोठी पोलीस कारवाई झाली. हे होऊन सुद्धा पुण्याच्या उपनगरामध्ये आणि आता पुण्याला लागून असलेल्या गावांमध्ये नशेचा एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे 'नशायुक्त पान' ! हे पान खाणाची तरुणांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे. या पानामध्ये अनेक दारूच्या बाटल्या पिल्यानंतर जेवढी नशा येते तितकी नशा एक पान खाल्ल्यानंतर येते, असे हे पान खाणारे सांगतात. 

या पानामध्ये किमाम नावाची तंबाखू मोठ्या प्रमाणात वापरली जातेच. हे नशायुक्त पान कधीही न खाणाऱ्या व्यक्तीने खाल्ले तर त्याला लगेच चक्कर येऊन खाणारी व्यक्ती बेशुद्ध पडते असे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. 

पूर्व हवेलीच्या लोणी काळभोर, कुंजीरवाडी, मांजरी, कदमवाकवस्ती, शेवाळेवाडी, वाघोली या उपनगरी गावांमध्ये असे नशायुक्त पान खाण्याचे एक व्यसनच तरुणांमध्ये दिसून येत आहे. पानपट्ट्यांवर दिवसाढवळ्या या तरुणांचा घोळका हमखास दिसून येतो. रात्रीच्या वेळेस या तरुणांमध्ये पान खाण्याची एक स्पर्धाच लागलेली दिसून येत आहे. 

लोणीकाळभोर एमआयटी कॉलेज कॅम्पस, त्याबरोबरच मांजरी येथील अण्णासाहेब मगर कॉलेज कॅम्पस त्याबरोबरच वाघोली खराडी परिसरातील कॉलेजेस तसेच पीजी पद्धतीने राहणाऱ्या महाराष्ट्रीयन आणि बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमध्येदेखील या नशायुक्त पानाचे सेवन करणे हे मोठे फॅड आहे. 

नशा मोठी किंमत स्वस्त
एका पानाची रक्कम ३० ते ३५ रुपये आहे. या पानामध्ये फुलचंद, पंचरत्न, नवरत्न व १२०, ३०० बनारस व कलकत्ता पानांचा समावेश आहे. या पानांमध्ये सुगंधित तंबाखू, सुपारी, कात, चुना, रिमझिम व एक अनोळखी नशेली पदार्थ टाकला जातो आणि याच पानाचा विडा खाण्यासाठी तरुण व तरुणींमध्ये पैशांच्या पैजा लागल्या जात आहेत. गोवा गुटख्यापासून त्या नशेच्या अनेक प्रकारच्या मादक पदार्थांच्या विक्रीसाठी आता राजरोसपणाने मार्केटिंग होऊ लागलेले आहे. त्यापैकी एक मार्केट आता खाण्याच्या पानांमधून समोर आल्याने ही वाढती चिंता पालक वर्गासाठी असेल.

पावडरची कमाल
या पानामध्ये वर सांगितले गेले प्रकार जरी अनेकांनी या पूर्व ऐकले असतील तरीदेखील यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पावडर टाकली जाते. या पावडरनुसार ऑर्डरप्रमाणे पान कडक करायचे की साधे हे ठरवले जाते. या पावडरबद्दल पान विक्रेते बरीच गुप्तता पाळून असतात. ही पावडर कशाची आहे या बद्दल माहिती दिली जात नाही. परंतु खाणारे पानाचे शौकिन सांगतात की या पावडरमध्ये नशेची जादू लपलेली आहे. 

पानामध्ये सुपारी, त्याबरोबरच तंबाकू तिच्या विविध प्रकारांमध्ये नशा करण्यासाठी वापरली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणावर तोंडाची कॅन्सर होण्याची संभावना असते. हळूहळू तोंडाचा आकार देखील लहान होत जातो. तोंडातील त्वचा नाजूक असते. तंबाकूमुळे तोंड्यामध्ये गाठी तयार होतात. 
_ डॉ. सुजित शिंदे, व्यावसायिक डॉक्टर, पुणे 

Share this story

Latest