संग्रहित छायाचित्र
लॉ कॉलेज रस्त्यावरील एका शाळेच्या ऑफिसचे कुलूप तोडून तीन लाखांची चोरी झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पंडितराव आगाशे शाळेतील एका शिक्षिकेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉ कॉलेज रस्त्यावरील पंडितराव आगाशे शाळा ही इंग्रजी माध्यम शाळा आहे. रविवारी शाळेला सुट्टी होती. चोरटे मध्यरात्री शाळेच्या आवारात शिरले. त्यांनी ऑफिसचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या ३ लाख १७ हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आणि तिथून पळ काढला. सोमवारी सकाळी शाळेचे ऑफिस उघडल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले.
मिळालेल्या महितीनुसार, शाळेकडून सहलीचे आयोजन केले जाणार होते. त्यासाठी ही रक्कम विद्यार्थ्यांनी जमा केली होती. तसेच शाळेच्या ऑफिसजवळच्या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे देखील समोर आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.