‘क्लोरल हायड्रेड’चा अवैध कारखाना उद्ध्वस्त; बनावट केमिकल ताडीसाठी केला जात होता उपयोग

पुणे : ‘नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो’कडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुरविण्यात आलेल्या ‘इनपुट’च्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकांनी मुंढवा परिसरात २३ मार्च रोजी कारवाई करीत २ लाख ९५ हजार रुपयांचा ‘क्लोरल हायड्रेड’ (सीएच) या रसायनाचा १४२ किलो ७५० ग्रॅम साठा जप्त केला होता.

‘क्लोरल हायड्रेड’चा अवैध कारखाना उद्ध्वस्त

गुन्हे शाखेची संगमनेरमध्ये धडक कारवाई

पुणे : ‘नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो’कडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांना पुरविण्यात आलेल्या ‘इनपुट’च्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकांनी मुंढवा परिसरात २३ मार्च रोजी कारवाई करीत २ लाख ९५ हजार रुपयांचा ‘क्लोरल हायड्रेड’ (सीएच) या रसायनाचा १४२ किलो ७५० ग्रॅम साठा जप्त केला होता. याठिकाणी केलेल्या तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या हरीबाबावाडी, वेल्हाळे याठिकाणी छापा टाकण्यात आला. याठिकाणावर पोलिसांना बनावट केमिकल ताडीकरिता लागणारे रसायन तयार करण्याचा कारखाना आढळून आला. एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी २ हजार २१७ किलो ५०० ग्रॅम तयार ‘क्लोरल हायड्रेड’ तसेच रिएक्टर, मशिनरी, काचेची उपकरणे व इतर साहित्य असा ५८ लाख ४६ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा कारखाना सील करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

प्रल्हाद रंगनाथ भंडारी (Pralhad Rangnath Bhandari) (वय ६१, रा. केशवनगर, मुंढवा), निलेश विलास बांगर (Nilesh Vilas Bangar) (वय ४०, रा. पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर, ता. आंबेगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर व परीसरामध्ये काही व्यक्ती बनावट ताडीकरिता लागणारे केमिकल विकत असल्याची माहिती अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. याबाबत नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक व हैदराबाद येथील विभागीय संचालक यांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी नीलेश बांगर याच्याविषयी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना माहिती कळवण्यात आली होती. पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर २३ मार्च रोजी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मुंढवा परिसरामध्ये प्रल्हाद भंडारी याच्या घरी छापा टाकला. त्याच्याकडे केमिकल / विषारी बनावट ताडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे ‘क्लोरल हायट्रेड’ आढळून आले होते. पोलिसांनी १४२ किलो ७५० ग्रॅम वजनाची ५ पोती जप्त केली होती. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात भादवि ३२८, ३४, महाराष्ट् दारुबंदी अधिनियम कलम ६५ अ, ब, क, ड, ई, ६ क, ड, ८१, ८३, ९० तसेच विष अधिनियम कलम २ (अ), ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भंडारी याच्याकडे केलेल्या तपासात निलेश बांगर हा केमिकल पुरवीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा ठावठिकाणा शोधला. पोलिसांनी पिंपळगाव खडकी येथील त्याच्या घरी छापा टाकला तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने संगमनेर येथील हरीबाबावाडी, वेल्हाळे गावात शेती गट नं. १७७ याठिकाणी पत्र्याचे शेड उभे केलेले होते. या  शेडमध्ये बेकायदेशिरपणे मानवी जीवितास धोकादायक असलेली ‘क्लोरल हायड्रेड’ची पांढरी पिवळसर रंगाची क्रिस्टल पावडर तयार केली जात होती. याठिकाणी अवैध कारखाना चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले. याठिकाणाहून २ हजार २१७ किलो ५०० ग्रॅम क्लोरल हायड्रेड जप्त करण्यात आले आहे. यासोबतच रिएक्टर, मशिनरी, काचेची उपकरणे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. भंडारी आणि बांगर यांना न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ही कारवाई अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रविण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे,  सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे १) सुनिल तांबे, सहायक आयुक्त (गुन्हे २) सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चब्हाण, सहायक फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार अजय राणे, बाबासाहेब कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, ओंकार कुंभार, अमेय रसाळ, सागर केकाण, तसेच अमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस अंमलदार संदीप जाधव, चेतन गायकवाड, युनिट ५ चे पोलीस अंमलदार शिवले, कांबळे, शेख, दळवी यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest