दुचाकीला धडक देऊन दोघांना नेले फरफटत; मद्यपी कार चालकावर गुन्हा दाखल
पिंपळे गुरव येथे एका स्कोर्पिओ कारने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीसह दोघांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (७ ऑगस्ट) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी मद्यपी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शरद किसन सुरवसे (वय २६, रा. पिंपळे गुरव) आणि मानतेश लिंगाप्पा चीगनुर अशी जखमींची नावे आहेत. शरद सुरवसे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कोर्पिओ कार (एमएच १४/एलपी ७४९२) चालक दत्तू रामभाऊ लोखंडे (वय ३९, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तू लोखंडे याने मद्य प्राशन करून त्याच्या ताब्यातील कार चालवली. पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आल्यानंतर त्याने शरद सुरवसे यांच्या दुचाकीला (एमएच १४/जेसी ९९४७) धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीसह शरद आणि मानतेश यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
या अपघातात शरद यांना मुकामार लागला आहे. तर मानतेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळे गुरव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. पण त्याची सुटका करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.