जादूटोणा संशयातून केला देवऋषीचा खून; अपघाताचा बनाव रचत मृतदेह फेकला नदीपात्रात

पुणे: जादूटोणा करून करणी केल्याच्या संशयातून एका देवऋषाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह गुंजवणी नदीपात्रात फेकण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करीत अपघाताचा बनाव रचण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 05:26 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

जादूटोणा संशयातून केला देवऋषीचा खून

भोर तालुक्यातील घटना

पुणे: जादूटोणा करून करणी केल्याच्या संशयातून एका देवऋषाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह गुंजवणी नदीपात्रात फेकण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करीत अपघाताचा बनाव रचण्यात आला. ही घटना भोर तालुक्यातील हातवे खुर्द गावात रविवारी घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

स्वप्नील ज्ञानोबा खुटवड (वय ३०, रा. हातवे खुर्द, रा. भोर) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. गणपत गेनबा खुटवड (वय ५२, रा. हातवे खुर्द, ता. भोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. गणपत यांचे गावात किराणा दुकान आहे. त्यांना गावात देवऋषी म्हणून ओळखले जायचे. स्वप्नील आणि गणपत नातेवाईक आहेत. ते जादूटोणा करीत असल्याचा तसेच त्यामुळेच आपली प्रगती होत नसल्याचा संशय आरोपीला होता. त्याच संशयातूनच खून केल्याची त्याने कबुली दिली आहे. दरम्यान, हातवे बुद्रुक गावाजवळ गुंजवणी नदीच्या पुलाजवळ नदीपात्रात गणपत यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला अडकवून ठेवण्यात आली होती. अपघातात गणपत यांचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपीने रचला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गणपत यांच्या डोक्याला झालेली जखम पोलिसांनी पाहिली. तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. सुरुवातीला राजगड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.

 गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर समांतर तपास करत होते. हातवे बुद्रुक गावात पोलिसांनी चौकशी केली. आरोपी स्वप्नीलचा गणपत यांच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. वादातून त्यांनी खून केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमगर, राजेंद्र गवळी, साहाय्यक निरीक्षक दत्ताजी मोहिते, कुलदीप संकपाळ, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजू मोमीन अतुल डेरे, बाळासाहेब खडके यांनी ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story