संग्रहित छायाचित्र
भोसरी : हसत्या खेळत्या पोटच्या १२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने बाप हवालदिल होता. मुलीने टोकाचे पाऊल का उचलले याचा उलगडा करण्यासाठी बापानेच जंग जंग पछाडले आणि धक्कादायक कारण ४ महिन्यांनी समोर आले असून, पोलिसांनी दोन मुलांना अटक केली आहे.
क्षितिज पराड आणि तेजस पठारे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चार महिन्यांपूर्वी ६ जून २०२४ च्या सायंकाळी भोसरी (Bhosari) येथील राहत्या घरी मुलीने टोकाचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी पोलीस तपासही सुरू होता. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. दुसरीकडे मुलीचे वडील आपल्या मुलीने आत्महत्या का केली असावी? यामुळे अस्वस्थ होते. अखेर वडिलांनीच मुलीला
न्याय देण्याचे ठरवले. अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की हसत खेळत आयुष्य जगणाऱ्या आपल्या मुलीने आत्महत्या केली, याचा तपास सुरू केला. घरात तिला कुणी काहीच बोलले नव्हते. मग नेमके असे काय घडले की तिने एवढे टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध लावायचा चंग वडिलांनी बांधला. यासाठी त्यांनी तिच्या वस्तू आणि कपडे तपासायला सुरुवात केली.
तेव्हा मुलीच्या ड्रेसच्या खिशात त्यांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीवर त्यांना एक मोबाईल नंबर आढळला. हा नंबर कुटुंबातील कोणाचाच नव्हता. तिथेच वडिलांना शंका आली. एक पाऊल पुढे जात त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि ते तपासले. त्यात त्यांना आढळले की, दोन मुले वारंवार मुलीच्या आसपास असल्याचे दिसून आले. अधिक तपास केला असता हे दोघे क्षितिज पराड आणि तेजस पठारे होते. तपासात क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मिळून मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला. त्यानुसार त्यांनी भोसली पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींवर पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भोसरी पोलीस तपास करीत आहेत.