संग्रहित छायाचित्र
पुणे: आळंदीतील एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे.
पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७७ व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (फ), ६, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित वारकरी संस्था ही खूप जुनी असून अलीकडेच ती नोंदणीकृत देखील झाली आहे. मृदुंग वादनाच्या शिक्षणासाठी ही संस्था प्रसिद्ध असून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
या प्रकारामुळे आळंदी परिसरात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.