संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: कंपनीत काम करत असताना सुपरवायझरने एका कामगाराला अधिकचे काम दिले. तसेच ते काम अति घाईत करून घेतले. हे काम करत असताना कामगाराचा हात मशीन मध्ये अडकून तुटला. ही घटना 16 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील आंबेठाण येथे वीआरएम मेटाझाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली.
दिनेश महादेव शर्मा (वय 29, रा. आंबेठाण, ता. खेड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुपरवायझर प्रफुल्ल राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश शर्मा हे काम करत असलेल्या कंपनीत आरोपी राठोड हा सुपरवायझर म्हणून काम करतो. राठोड याने दिनेश शर्मा यांना दिलेले टार्गेट त्यांनी पूर्ण केले. तरीही शर्मा यांना घरी जाण्यासाठी मोकळीक न करता त्यांना आणखी दोन तास काम करण्यास सांगितले. ते काम लवकर पूर्ण करण्यासाठी राठोड याने घाईगडबड केली. त्यावेळी शर्मा यांचा उजवा हात ते काम करत असलेल्या हायड्रोलिक प्रेस मशीन मध्ये अडकला. त्यामध्ये शर्मा यांचा हात तुटला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.