संग्रहित छायाचित्र
महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय (Prostitute business) करून घेणाऱ्या महिलेवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. तिच्या ताब्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (१ एप्रिल) सायंकाळी मारुंजी येथे करण्यात आली. (sex racket)
पोलिसांनी संबंधित दलाल महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथे एक दलाल महिला आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या फ्लॅट मध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजता महिलेच्या फ्लॅटवर छापा मारून कारवाई केली. दलाल महिलेच्या ताब्यातून दोन मुलींची पोलिसांनी सुटका केली. तसेच दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.