पोलीस ठाण्यातून पसार झालेली चोर गजाआड; छत्रपती संभाजीनगरमधून घेतले ताब्यात

वारीमध्ये भाविकांच्या गळ्यातील सोनासाखळ्या हिसकावणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तावडीमधून ही महिला पसार झाली होती.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : वारीमध्ये भाविकांच्या गळ्यातील सोनासाखळ्या हिसकावणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तावडीमधून ही महिला पसार झाली होती. याप्रकरणात एका महिला पोलिसाला निलंबित करण्यात आले होते. या सोनसाखळी चोर महिलेला हडपसर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. 

धुरपता अशोक भोसले (वय ३१, रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पुण्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांचे आगमन झाले होते. पुणे मुक्कामानंतर या पाळख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होताना या पालख्या हडपसर भागामधून पुढे जात असताना चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यामध्ये धुरपता भोसले हिचा समावेश होता. तिला ३ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या भोसलेला तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या कोठडीतून (लॉकअप) हडपसर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष चुकवून भोसले पसार झाली होती. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली होती. 

हडपसर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले होते. या फुटेजवरून भोसले रिक्षातून मुंढव्याकडे गेल्याचे समोर आले होते. नगर रस्ता परिसरात येऊन बसने ती छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना करण्यात आले. तिच्या राहत्या टाकळी गावातून आरोपी भोसलेला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक मंगल मोढवे, उमेश गिते, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, ज्योतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांनी ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest