पोलीस दल हादरले! पाच वर्षाच्या चिमुकलीवर पोलिसाकडून अत्याचार
विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25) घडली.
सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण हेडक्वार्टर येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.
विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.