प्रशांत दिघे
सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याने काळेवाडी पोलिसांवर दबाव टाकून शहरातील नामचीन गुंड प्रशांत दिघे याचे नाव एका गंभीर गुन्ह्यातून वगळले. मात्र, ही बाब अति वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आतापर्यंत एकूण १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा दबाव झुगारून लावल्याने या नेत्याने पोलिसांच्या विरोधात आरोप करायला सुरुवात केल्याचे आता दिसून येत आहे.
अपघातात वाहनाचे झालेले नुकसान भरून द्यावे, या कारणावरून काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (२२ डिसेंबर) मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यानुसार, दोन्ही गटांतील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या हाणामारीत कुख्यात गुंड प्रशांत दिघे याचाही सहभाग होता. परंतु, शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने दिघे याचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी स्थानिक पोलिसांवर दबाव टाकला. या दबावाला बळी पडत स्थानिक काळेवाडी पोलिसांनी या गुन्हेगाराचे नाव गुन्ह्यातून वगळले. मात्र, ही गोष्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला सूचना देत आरोपी दिघे याचे नाव गुन्ह्यात घेऊन त्याला अटक करण्याची सूचना दिली. त्यानुसार, स्थानिक पोलिसांनी आरोपी दिघे याला अटक केली.
मात्र, या गोष्टीने बड्या राजकीय नेत्याचा राग अनावर झाला. सत्ताधारी पक्षाच्या या नेत्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून दिघे याच्यावर कारवाई करू नये, असा दबाव टाकला. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी या राजकीय नेत्याचा दबाव झुगारून लावला. त्यामुळे पोलीस कसे चुकीचे काम करतात, कसे पैसे खातात, असे आरोप हा बडा राजकीय नेता करत असल्याची चर्चा सुरू आहे.
गृह खाते, पिंपरी-चिंचवड पोलीस चांगले काम करत आहे - आमदार गोरखे
संबंधित बडा राजकीय नेता पिंपरी-चिंचवड पोलिसांवर आरोप करत असतानाच भाजप प्रवक्ते आमदार अमित गोरख यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तसेच गृहखात्याच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. गृह खाते तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस चांगले काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खाते सक्षमपणे सांभाळत आहेत. शहरातील मागील दोन वर्षांतील निवडणुकीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अत्यंत चांगले काम केल्याने कोणताही बाका प्रसंग घडला नाही. तसेच निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. पोलिसांचे काम चांगले आहे. महायुती असताना सामोपचाराने आणि चर्चेने विषय सोडवता येतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.