Pune Crime News : बांग्लादेशी डॉक्टरला बेड्या; एक वर्षाचा असताना १९७२ साली आईवडिलांनी आणले पुण्यात
पुणे : पाकिस्तानविरोधी युद्ध पुकारल्यानंतर बांग्लादेश वेगळा देश बनला. त्यावेळी एक वर्षांच्या मुलाला घेऊन बांग्लादेशी हिंदू कुटुंब आश्रयासाठी १९७२ साली भारतात आले. भारताच्या विविध भागात वास्तव्य केल्यानंतर २५ वर्षांपूर्वी तो पुण्यात आला. पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे त्याने होमिओपॅथी दवाखाना सुरू केला. हा डॉक्टर बांग्लादेशी असल्याची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हारुलाल पंचानन बिश्वास (वय ५३, रा. काकडे बिल्डिंग, थेऊर, ता. हवेली) असे डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारुलाल बिश्वास यांचा जन्म बांगला देशात झाला होता. त्यावेळी बांग्लादेशात पाकिस्तानची सत्ता होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले आणि बांग्लादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला. त्यानंतर पंचानन बिश्वास हे पत्नी व हारुलाल यांना घेऊन भारतात आले. देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे आईवडिल मोलमजुरी करुन रहात होते. त्यांनी मुंबई येथे होमिओपॅथीचे शिक्षण घेतले असल्याचा त्यांचा दावा आहे. गेली २५ वर्षे ते थेऊर येथे होमिओपॅथी डॉक्टर म्हणून काम करत आहेत.
हारुलाल बिश्वास हे बांगला देशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असताना त्यांनी आपला जन्म बांगला देशात झाल्याचे सांगितले. बांगला देशी नागरिक असतानाही बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करुन त्यावरुन आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, निवडणुक आयोगाचे कार्ड ही बनावट कागदपत्रे तयार केली असल्याचे आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.