Pune Crime News : घटस्फोटाची बतावणी करून महिलेसोबत बनवले शरीरसंबंध; लग्नाचे दाखवले आमिष : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याची बतावणी करून एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या फसवणुकीबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा देताच त्याने या महिलेला भुलवण्यासाठी तिच्या खात्यावर पैसे पाठविले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ मे २०२४ व १९ मे २०२४ रोजी घडला होता.
एका ३२ वर्षाच्या महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरुन, पोलिसांनी तिच्या ओळखीच्या मुंबईतील ३८ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आरोपीसोबत एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. या महिलेचे पासपोर्टसंबंधी काम होते. या कामानिमित्त त्यांच्यात ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणे सुरू झाले. तसेच, व्हॉटसअपवर त्यांच्यामध्ये बोलणे सुरू झाले. ते एकमेकांच्या ख्यालीखुशाली बाबत विचारपूस करु लागले. फिर्यादी यांनी आपण घटस्फोटीत असल्याचे सांगितले.
तेव्हा या तरुणानेही आपला घटस्फोट झाला असून सध्या आपण एकटेच असल्याची बतावणी केली. त्यानंतर तो फिर्यादीकडे लग्नासाठी आग्रह धरण्यास सुरुवात केली. तिला हॉटेलमध्ये नेऊन इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांना त्याने आईसोबत रहात असल्याचे खोटे सांगितले. तसेच ‘अमेरिके’ वरुन परत आल्यावर याविषयी बोलू असे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीसोबत असलेला संपर्क त्याने तोडून टाकला. तसेच, फिर्यादीचा मोबाईल क्रमांक, व्हॉटसअप ब्लॉक केला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याला ही माहिती समजताच त्याने महिलेची भेट घेतली. ‘मी तुझ्यासोबत खोटे बोललो’ अशी कबुली त्याने दिली. त्याच्याविरोधात तक्रार देणार असल्याचे सांगताच त्याने फिर्यादीच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले. तसेच, ‘माझ्याविरोधात तक्रार करु नको’, असे बजावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.