संग्रहित छायाचित्र
भीमथडी जत्रेत स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड, पेनड्राइव्ह चोरून नेला. ही चोरी तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले. त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी चौघा चोरट्यांना अटक केली आहे.
मनोज भगतसिंग पवार (वय ४१), संदीप संजय गौड (वय ३२), रतिलाल प्रेमलाल परमार (वय ५५), विकी राजू साळुंखे (वय ३५, सर्व रा. येडा चौक, जामखेड, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भाग्यश्री मंदार जाधव (वय २८, रा. आझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंचननगर येथील भीमथडी जत्रेत रविवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भीमथडी जत्रेत महिला बचत गटाचा स्टॉल आहे. स्टॉलवर कुरडया, पापड, लोणची यांची विक्री करण्यात येत आहे. रविवारी जत्रेत खूप गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी आतल्या बाजूला ठेवलेल्या बॉक्समधून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्टॉलवरील सीसीटीव्ही पाहिले. तेव्हा रोकड चोरताना चोरटे त्यात कैद झाले होते. त्यावरून त्यांनी भीमथडी जत्रेतील असणार्या या चोरट्यांना पकडले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यात चोरटे दिसून आले. त्यावरून शोध घेऊन चोरट्यांना पकडले. भीमथडी जत्रेत शुक्रवारी (दि. २०) एका महिलेच्या स्टॉलमधून ७० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या महिलेचा कपड्यांचा स्टॉल आहे. त्या ग्राहकांना कपडे दाखवत होत्या. त्यावेळी हँगरला लावून ठेवलेल्या कपड्यांच मागे कोपर्यामध्ये ठेवलेली यांची पर्स चोरट्यांनी लांबविली. त्या पर्समध्ये ७० हजार ५५० रुपये रोख आणि पेनड्राइव्ह होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.