संग्रहित छायाचित्र
पुणे : शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याचे काम करणाऱ्या एका स्कूल व्हॅन चालकाने १५ वर्षीय विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ११ डिसेंबर रोजी कात्रज ते गोकुळनगरदरम्यान घडली.
कय्यूम अहमद पठाण (वय ३३, रा. विद्यानगर, कोंढवा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी एका शाळेमध्ये दहावीत शिकण्यास आहे. पिडीत मुलगी तिची आई, वडील, बहीण, मावसभाऊ, भाऊ आणि आजी यांच्यासह राहण्यास आहे. ती कात्रज येथील एका विद्यालयात ९ वीमध्ये शिकत आहे. तिला शाळेत नेण्या-आणण्याकरिता आरोपी कय्यूम पठाण याची खासगी स्कूल व्हॅन लावण्यात आलेली आहे. या स्कूल बसमध्ये ती एकटीच नववीमधील मुलगी असून उर्वरीत लहान मुले-मुली असतात.
ती प्रवासादरम्यान मागील सीटवर बसत असते. ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी पठाणच्या स्कूलबसमधून कात्रजपासून गोकूळनगरकडे घरी येत होती. रस्त्यामध्ये आरोपीने एका मुलाला सोडण्यासाठी गाडी थांबवली. पिडीत मुलीने या मुलाला खाली उतरवले. त्यानंतर स्कूलबसच्या पुढील दाराजवळ ती उभी होती. त्यावेळी आरोपीने तिला अश्लील स्पर्श केला. तसेच, समोरच्या सीटवर येवून बस, असे म्हणाला. घाबरलेली ही मुलगी मागील सीटवर जाऊन बसली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीही सांगितले नव्हते. दोन-तीन दिवसानंतर पुन्हा स्कूल बसमधून घरी परत येत असताना, आरोपीने तिला ‘डोंगरावर चल’ असे म्हणत विनयभंग केला.
त्यानंतर, २३ डिसेंबर २०२४ रोजी तिने मावसभाऊ शिवा नाईकवडे याला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तिने मावसभावासह कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन पठाणविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.
तर, हडपसरमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेत एका शाळेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याने एका महिलेला मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेची मुले आरोपी काम करीत असलेल्या शाळेमध्ये शिकण्यास आहेत. आरोपीने या महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला होता. तुमच्या मुलांना काही अडचण असल्यास तुम्हाला कळवित जाईन असे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याने २३ डिसेंबर रोजी दुपारी या महिलेला ‘हाय... आय लव्ह यू जान, स्वीट हार्ट’ असा मेसेज केला. तसेच, ही महिला रहात असलेल्या भागात येऊन पाठलाग करीत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.