संग्रहित छायाचित्र
पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील कॉलेज (Dr. DY Patil College) मध्ये एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तिघांनी मिळून एका महिलेची १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली. ही घटना जानेवारी ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत तळवडे आणि पिंपरी येथे घडली.
विशाल पवार, भास्कर राव, कुलभूषण कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भास्कर राव हे डॉ. डी वाय पाटील कॉलेजच्या व्यवस्थापनात काम करत असल्याचे फिर्यादीस खोटे सांगितले. फिर्यादीस एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमाला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून १९ लाख ७५ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना प्रवेश न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.