पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) जिल्ह्यातील जवळपास साडेआठशे गावांची हद्द आहे. दिवाळीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडप्रमाणेच ग्रामीण भागातील विविध ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल उभारले आहेत. त्यासाठी शहरातील अग्निशामक विभागाकडे रीतसर अर्ज दाखल करावे लागतात. मात्र, ग्रामीण भागातील या फटाक्यांच्या स्टॉलसंदर्भात एकही अर्ज पीएमआरडीएच्या विभागाकडे आलेला नाही. तर, या विभागांनीही अद्याप कोणाला परवानगी दिली नाही. परिणामी, जिल्ह्यातील साडेआठशे गावात उभारलेले फटाके स्टॉल नेमके कोणाच्या संमतीने उभारण्यात आले आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये स्थानिक पातळीवर अग्निशमन विभाग परवानगी देते. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्यास संबंधित फटाका स्टॉलची माहिती अग्निशामक विभागाकडे असते. मात्र त्याला फाटा देत शहरातील विविध भागात फटाका स्टॉल उभारल्याचे दिसून येतात. त्यातच आता ग्रामीण भागात देखील या स्टॉलचे मोठ्या प्रमाणात पेव सुटले आहे. त्यात हिंजवडी, मारुंजी, चाकण, मावळ, मुळशी, भोर या यासारख्या महत्त्वाच्या आणि मोठ्या लोकवस्तीमध्ये फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या गावातील स्थानिक पातळीवरती परवानगी मिळाली तरी, अग्निशमन विभागाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकानेही अशी परवानगी घेतल्याचे नसल्याचे उघडकीस आलेले आहे. याबाबत अग्निशमन दल विभागाकडून माहिती घेतल्यास असे निदर्शनास आले की, जाचक अटी, कागदपत्रांची पूर्तता आणि अधिकृत फटाका स्टॉलसाठी नियम आहेत. पर्यायाने त्याने नियमाची पूर्तता संबंधित व्यवसायाकडून होत नसल्याने ते परवानगी घेण्यासाठी येतच नाहीत. अनेकदा आवाहन करूनही याबाबत कागदपत्रे सादर न केल्याने परवानगी देता येत नाही, असे सांगितले. तसेच विविध भागातून नागरिक परवानगीसाठी विचारतात मात्र, त्यानंतर ते पुन्हा येत नसल्याचे अग्निशामक विभागातील सूत्रांनी सांगितले.
किराणा दुकानांमध्येच फटाका स्टॉल
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये स्वतंत्र असा फटाका स्टॉल उभारत नाहीत. त्यामुळे आपले किराणा दुकान असेल अथवा भाजीपाल्याचा गाडा त्यातच या फटाक्यांची विक्री होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे कोणी तपासणी करायला येत नसल्याने हा प्रकार दिवसेंदिवस वाढवत आहे. ग्रामीण भागातील गल्लीबोळात सर्वच दुकानात आता फटाके विक्री होऊ लागली आहेत.
अग्निशमन दलात मनुष्यबळाची कमतरता
फटाक्यामुळे शहरात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. ग्रामीण भागातही अलीकडे फटाक्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाला तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये वेळ लागतो. त्यातच मनुष्यबळाची कमतरता असल्याने एकाच वेळी आगीचा कॉल आल्यास मोठ्या प्रमाणात धावपळ होते. त्यामुळे यंदाची दिवाळी अग्निशमन दलापुढे मोठे आव्हान असणार आहे.
पिंपरी-चिंचवड, पुणे शहरांमध्ये फटाका स्टॉल उभारण्यासाठी तेथील अग्निशमन दल परवानगी देते. मात्र, पीएमआरडीएने तशी परवानगी दिलेली नाही. विक्रेत्यांना आवाहन करूनही ते येत नाहीत.
- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए