संग्रहित छायाचित्र
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या हृदयात रक्ताची गाठ तयार झाल्यामुळे त्यांना श्वासनास त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची अँजिओग्राफी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरुन देण्यात आली.
दरम्यान, आंबेडकर कुटुंबियांनी, कुणीही प्रश्न विचारून उपचारांमध्ये व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा. पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत.’ असे आवाहान केले आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार असल्याच पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. वंचिततचे अनेक ठिकाण उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. त्यातच प्रमुख नेत्यांना आरोग्याची समस्या उद्भवल्याने पक्षाच्या प्रचार यंत्रणेवर परिणाम होणार असल्याचे दिसते आहे. मात्र, दुसरीकडे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बळासाहेबांनी पूर्ण विश्रांती घ्यावी असे आवाहन केले आहे.