Pune News : ऐन दिवाळीत कचऱ्याचे डोंगर; कचरा उचलण्याचे महापालिकेपुढे आव्हान

पुणे शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. शहरातील पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढत असतानाच दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 30 Oct 2024
  • 12:11 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

यंत्रणा तोकडी असली तरी घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियोजन केल्याचा दावा

पुणे शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. शहरातील पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढत असतानाच दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. अपुऱ्या यंत्रणेमुळे महापालिकेपुढे (Pune Municipal Corporation) कचरा उचलण्याचे मोठे आव्हान आहे. (Pune News)

शहरात दिवसाला सुमारे २,२०० टन कचऱ्याची निर्माण होते. यापैकी सुमारे ९०० ते १,००० टन कचरा ओला असतो, तर १,१०० ते १,२०० टन कचरा सुका असतो. शहराच्या प्रत्येक भागात बाजारपेठा, गल्लीबोळातील रस्ते झाडण्याचे काम तसेच कचरा संकलित केला जातो. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छ सेवकांसह घंटागाडीची यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेत काम करणाऱ्या सेवकांची संख्या कमी आहे. त्यामुळे या कामावर ताण येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. असे असले तरी, दिवाळीत कचरा उचलण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याचे घनकचरा विभागाने ‘सीविक मिरर’ला सांगितले.

दिवाळी  (Diwali) सणामुळे प्रत्येक जणाकडून सजावट केली जात आहे. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी स्वच्छता करण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे.

क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत पडीक जागेचे झाडकाम करण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मध्यवर्ती वस्तीतील काही भाग वगळता उपनगरांमध्ये रस्ते नियमित झाडले जात नाहीत. माती, दगड, कागद, मेणकापड यांसह अन्य प्रकारचा कचरा रस्त्यांवर तसेच पादचारी मार्गांवर पडलेला असतो. तसेच गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत रस्ते झाडण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांकडून बैठका घेऊन शहर स्वच्छतेबाबत सूचना दिल्या जात असल्या तरी, परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठ दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दीने फुलून गेली आहे. रस्त्यावरील फेरीवाले तसेच विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. दिवाळीच्या निमित्ताने घर, दुकान स्वच्छता केली जात असल्याने त्यामुळे सुक्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. हा कचरा रस्त्यावर येऊन पडत असला तरी वेळेवर उचलला जात नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी (दि. २५, २६, २७) शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे (Waste) ढीग मध्य वस्तीसह उपनगरांमध्ये लागले होते. हा कचरा अखेर सोमवारी (दि. २८) उचलण्यास सुरुवात झाली.

दिवाळीत कचरा प्रकल्पात काम करणारे कर्मचारी रजेवर असतात. त्यामुळे प्रकल्पाच्या कामावर ताण येतो. कचरा संकलित वर्गीकरण करणे आवश्यक असते. कचरा संकलनाची यंत्रणा ढासळू नये, यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळेचे नियोजन करण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत कचरा संकलनाबाबत नियोजन करण्यात आले आहे.

प्रशासनाला जमेना वेळेत कचरा उचलण्याचे नियोजन
महापालिकेकडून घरोघरो कचरा गाडीच्या माध्यमातून कचरा संकलित केला जात आहे. त्यासाठी शहरात स्वच्छ संस्थेसह इतर संस्था काम करत आहे. त्यांच्याकडून कचरा संकलन केले जाते. त्यापोटी शुल्क आकारले जाते. काही नागरिकांपर्यंत ही घंटा गाडी पोहोचत नाही. तसेच काही जणांकडून पैसे चुकवण्यासाठी कचरा रस्त्याच्या बाजूला फेकला जातो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण होते. कचऱ्याची अशी निर्माण झालेले स्पॉट कायमचे बंद करण्यासाठी महापालिकेकडून नियोजन केले जात आहे.

तसेच दंडात्मक कारवाई केली जात आहे. काही वेळा नागरिकांना कचरा उचलण्यास भाग पाडून दंड ठोठावण्यात आला. नागरिकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू असताना प्रशासनाला मात्र कचरा वेळेत उचलण्याच्या कामाचे नियोजन करता येत नसल्याचे दिसते.

दरवर्षी दिवाळीत कचरानिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. बाजारपेठेतील गर्दी, फटाक्यांसह दुकाने तसेच घराघरांतील स्वच्छतेमुळे सुक्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सुटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कचरा साठला होता. तो आता उचलण्यात आला आहे. दिवाळीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आली असून सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना शून्य कचरा उपक्रम राबविण्याला जाणार आहे.
- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest