Shaniwarwada : पर्यटकांनो शनिवारवाड्याचा इतिहास आता डिजिटल ऑडिओ च्या माध्यमातून अनुभवा

पुणे शहराचे (Pune News) वैभव आणि ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्याचा (Shaniwarwada) इतिहास सर्वांनाच माहितीच आहे. शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होते. पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता असते.

Shaniwarwada

पर्यटकांनो शनिवारवाड्याचा इतिहास आता डिजिटल ऑडिओ च्या माध्यमातून अनुभवा

पुणे: पुणे शहराचे (Pune News) वैभव आणि ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्याचा (Shaniwarwada) इतिहास सर्वांनाच माहितीच आहे. शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होते. पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे आता पर्यटकांना डिजिटल ऑडिओच्या माध्यमातून इतिहास अनुभवता येणार आहे. याबाबत प्रस्ताव महापालिकेच्या विद्युत विभागाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी  सादर केला होता. त्याला मान्यता मिळाली असून लवकरच ही सुविधा सुरु होणार आहे.

शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना डिजिटल ऑडिओ गाइडच्या स्वरूपात उपलब्ध केला जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून वाडा परिसरात ‘क्यूआर कोड’ बसविण्यात येणार आहे. मराठीसाठी ५० रूपये, हिंदीसाठी ७५ रूपये तर इंग्रजीतून माहितीसाठी १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. परदेशी पर्यटकांसाठी अन्य भाषांमधूनही लवकरच ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरल्यानंतर पर्यटकांना त्यांच्या मोबाइलद्वारे ही माहिती ऐकता येईल. यासाठी क्यू आर कोडचे फलक पालिकेतर्फे उभारले जातील. तर डिजिटल ऑडिओ गाइडसाठीचे तंत्रज्ञान व पूरक यंत्रणेची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर असेल. या सेवेतून मिळणारे उत्पन्न पालिका व संबंधित कंत्राटदार कंपनी समसमान प्रमाणात वाटून घेणार आहे. या सुविधेमुळे पुण्यासह देशातील आणि परदेशी पर्यटकांना याचा फायदा होणार आहे. 

पुरातत्व विभागातर्फे १९१९ मध्येच शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे शनिवारवाडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अधूनमधून येथे वारसा फेरी म्हणजे हेरिटेज वॉकही आयोजित केला जातो. सायंकाळी येथे साउंड अँड लाइट शो द्वारे शनिवारवाड्याची, पेशव्यांच्या इतिहासाची माहितीही दिली जाते. मात्र, दिवसा येथे येणाऱ्या पर्यटकांना केवळ तज्ज्ञ मार्गदर्शकांवर (गाईड) अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच पालिकेकडून शनिवारवाडा परिसरात डिजिटल ऑडिओ गाइड सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला शनिवारवाडा हा केवळ पुण्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. १७३० मध्ये शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू झाले तर १७३२ मध्ये शनिवारवाड्याची वास्तुशांत झाली. यानंतर मराठेशाहीचा भरभराटीचा आणि अस्ताचाही काळ शनिवारवाड्याने अनुभवला आहे. त्यामुळेच राज्याबरोबरच देश विदेशातील पर्यटक शनिवारवाड्याला आवर्जून भेट देत असतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest